Vidarbha Weather Update : राज्यात जवळ जवळ सर्वत्र दमदार पावसाची (Heavy Rain) बॅटिंग सुरू असताना विदर्भात (Vidarbha Weather) मात्र पावसाने चांगलीच प्रतीक्षा करायला लावली आहे. जूननंतर निम्मा जुलै निघून गेल्यावरही नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असतानाच गेल्या काही दिवसांपासून गुंगारा दिलेल्या पावसाने शनिवारी नागपूरसह विदर्भातील इतर भागातही दमदार पावसाने हजेरी लावलीय.


हवामान विभागाने (IMD) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने यलो अलर्ट जारी केला असूनही पाऊस न येता नुसत्याच घामाच्या धारा निघत असल्याने विदर्भवासी काहीसे वैतागले असल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आता हव्याहव्याशा वाटणाऱ्या पावसाने अशीच दमदार बंटिंग पुढील काही दिवस करावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर विदर्भातील बहुतांश ठिकाणी पडलेल्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत केल्याचे बघायला मिळाले आहे. यात अनेक नदी नाल्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे बाळिराजा आता काहीसा सुखावला असून दुबार पेरणीचे संकटही आता टळले आहे.


यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी


चार दिवसाच्या विश्रांतीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा पावसाची दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर ढगाळी वातावरण आणि उन्ह होते. मात्र, दुपारी चारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने चांगलाच जोर पकडला. विजेच्या गडगडाटसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात 90 टक्के  पेरणी झाल्या असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, आज आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर नागरिकांना उकड्यापासून सुटका झाली.  


नदीला आला पूर,वाहतूक विस्कळीत


वाशिम जिल्ह्यात सकाळपासून अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील राजाकीन्ही ते वाशिमला जोडणाऱ्या मार्गावर एरंडा गावाजवळील असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. परिणामी दोन्ही बाजूने काही नागरीक घरी जाण्यासाठी निघाले असता रस्तात अडकले असल्याचे चित्र आहे. शेतात काम करणारे  अनेक मजूरही या पूलावरील पाण्यामुळे अडकले आहे. पुलावरून पाणी कमी झाल्यावर अडकलेल्या नागरिकांना घरी परतता येणार आहे. मात्र सध्यातरी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. 


गोसीखुर्द धरणातून 1000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग, नागरिकांना  सतर्कतेचा इशारा


गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच धापेवाडा बॅरेजचे 14 दरवाजे उघडण्यात आल्यानं गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारी चार वाजता गोसीखुर्द धरणाचे तीन ते पाच दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात येणार आहे. त्यातून 700 ते 1000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्यानं हा पाण्याचा विसर्ग 2000 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती गोसीखुर्द धरण प्रशासनानं दिली आहे. त्यामुळं नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनानं दिला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या