Maharashtra Rain Update : पावसाळा (Rain) सुरू होण्यासाठी अजून महिनाभराचा काळ शिल्लक आहे. असे असताना राज्यातील धरणांमध्ये (Dam) जवळपास 36  टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. विशेष म्हणजे, पुणे विभागात (Pune Division) सर्वात कमी म्हणजे केवळ 28.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात या भागातील शेतीसह उद्योग-व्यवसायांना पाणीटंचाईचा (Water Issues) सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन देखील वाढत असल्याने, आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. 


राज्यात सध्या 139 मोठ्या, 259 मध्यम आणि 2605 लहान अशा एकूण 3003 धरणांमध्ये मिळून एकूण 22350.14 दशलक्ष घनमीटर (789 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण 36.64 टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा 37.39 टक्के होता. यावरून यंदा पाणीसाठा काहीसा कमी असल्याचे स्पष्ट होते. त्यातच यंदा पाऊस कमी असल्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे. त्यामुळे यावर्षी पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलण्याची गरज असल्याचे देखील बोलले जात आहे. 


राज्यातील पाणीसाठा परिस्थिती...



  • राज्यात सर्वाधिक पाणीसाठा यंदा अमरावती विभागात असल्याचे दिसून येते.

  • छत्रपती संभाजीनगर विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 41.75  टक्के आहे.

  • कोकण विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 40.92 टक्के आहे.

  • नागपूर विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 41.63 टक्के आहे.

  • नाशिक विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 39.58 टक्के आहे.

  • पुणे विभागात धरणांची संख्या जादा असली तरी पाणीसाठ्याची टक्केवारी कमी दिसून येत असून, 28.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 


पुणे विभागात पाणीसाठ्याची टक्केवारी कमी...


राज्यात सद्या उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण 36.64 टक्के असून, गेल्यावर्षी याच तारखेला हा पाणीसाठा 37.39 टक्के होता. मात्र पुणे विभागात पाणीसाठ्याची टक्केवारी सर्वात कमी आहे. पुणे विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 720 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 7527.85 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तर पुणे विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण 28.83 टक्के आहे.  


राज्यात एकूण 184 टँकरने पाणीपुरवठा... 


राज्यातील अनेक भागात आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अनेक गाव आणि वस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे नियोजन करावे लागत आहे. तर सद्या राज्यातील 235 गावात आणि 606 वाड्यावर एकूण 184 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 43 शासकीय आणि 141 खाजगी टँकरचे समावेश आहे. तर मुंबई विभागात 100, नाशिक विभागात 37, पुणे विभागात 26, छत्रपती संभाजीनगर 5, अमरावती विभागात 16 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Solapur News : उजनी धरण मायनसमध्ये जाणार, सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली!