Solapur News : उन्हाळा सुरु होतानाच यंदा शंभर टक्के भरलेले उजनी धरण (Ujani Dam) आज वजा पातळीत जाणार आहे. यामुळे दुष्काळी सोलापूर (Solapur) जिल्ह्याची चिंता वाढणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 37 दिवस आधी धरण मायनसमध्ये जाणार असल्याने पाणी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. त्यातच यंदा पाऊस काळ कमी असल्याचे हवामान खाते सांगत असताना उजनी झपाट्याने कमी होत चालल्याने पुन्हा दुष्काळाची (Drought) टांगती तलवार सोलापूर जिल्ह्याच्या डोक्यावर राहणार आहे.


सध्या कालवा समितीच्या पाणी वाटप निर्णयानुसार कालवा, सिना माढा बोगदा आणि दहिगाव सिंचन योजनेसाठी पाणी सोडणे सुरु आहे.  गेल्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने 12 जूनला उजनी धरण वजा पातळीत गेले होते. यंदा मात्र तब्बल 37 दिवस आधीच धरण वजा पातळीत जात असल्याने शासनाच्या कालवा पाणी वाटप समितीने काळजीपूर्वक उर्वरित पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. 


पाण्याची मागणी वाढली


यंदा परतीच्या पावसाऐवजी अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने बळीराजा अडचणीत आहे. यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे. वाढत्या उन्हामुळे दर महिन्याला उजनी धरणातील 1 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मागील वर्षी 15 ऑक्टोबरपासून आजपर्यंत 59 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या उन्हाळी पाणी पाळी सुरु असून ती 20 मे पर्यंत चालणार आहे. या उन्हाळी पाणी पाळीसाठी 6 टीएमसी पाणी लागणार असून सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून 6 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. अजूनही दहिगाव सिंचन योजनेसाठी पाणी देणे सुरु आहे. यातच आषाढी यात्रेसाठी जूनमध्ये उजनी धरणातून पुन्हा पाणी सोडावे लागणार आहे. अशा आणीबाणीच्या वेळी काही दिवसापूर्वी पाटकूल येथे उजनी उजवा कालवा फुटला होता तर त्यानंतर संगमजवळ जलसेतू देखील फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. 


पाण्याची काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करण्याची गरज


ही आकडेवारी पाहता यंदा या उन्हाळ्यात म्हणजे 30 जून अखेर धरण वजा 35 टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. उजनी धरणाच्या वजा साठ्यात 63 टीएमसी एवढा पाणी साठा असला तरी यात 10 ते 12 टक्के गाळ असल्याने तेवढा पाणी साठा केवळ कागदावर आहे. त्यामुळे आता पाण्याचे काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर केल्यास पाऊसकाळ लांबला तरी दुष्काळाच्या झळा कमी प्रमाणात सोसाव्या लागतील. 


...म्हणून पाणी लवकर संपले


गेल्या वर्षी पाऊस काळ संपल्यावरही पडलेल्या पावसाने तब्बल 4 टीएमसी पाणी धरणात जमा झाल्याने 12 जून रोजी धरण मायनस पातळीत गेले होते. याचबरोबर सोलापूर महापालिकेसह, सर्वच पाणी पाळ्या यंदा एक महिना लवकर द्याव्या लागल्यानेही पाणी लवकर संपले आहे. आता उजनी कालवा सल्लागार समितीने तातडीने पाणी नियोजनाची बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे.