7th May In History: प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. इतिहासात प्रत्येक दिवसातील महत्त्वाच्या घडामोडींची नोंद घेतली जाते. आजच्या दिवशी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला होता. तर, धर्मशास्त्राचे अभ्यासक भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्मही आजच्या दिवशी झाला होता. त्याशिवाय, इतरही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी...


1861: पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म


ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक असलेले रविंद्रनाथ टागोर यांचा आज जन्मदिवस. रविंद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असेही संबोधले जाते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार होते. रविंद्रनाथ टागोर हे दोन देशांच्या राष्ट्रगीतांचे जनक आहेत. रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन झाले आहे. असा विक्रम असणारे ते जगातील एकमेव व्यक्ती आहेत.


रविंद्रनाथ यांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. 1877 पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.  


संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.संगीत,साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.


1880 : भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांचा जन्म 


भारतशास्त्रज्ञ, संस्कृत विद्वान, भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक पांडुरंग वामन काणे यांचा आज जन्मदिन. पांडुरंग वामन काणे हे प्रसिद्ध भारतीय धर्मशास्त्राचे अभ्यासक आणि कायदेपंडित होते. ब्रिटीश शासनाने 1942 साली  त्यांना `महामहोपाध्याय’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. भारत सरकारने 1963 मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. 


प्राचीन ज्योतिषशास्त्र, खगोलविद्या, योगशास्त्र, पुराणे, टीका आणि मीमांसा, सांख्य तत्त्वज्ञान, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, धर्मशास्त्र, मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, अशा असंख्य विषयांवर त्यांनी सुमारे 40 ग्रंथ, 115 लेख, 44 पुस्तक परिचय/परीक्षणे लिहिली आहेत.


समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार ही सुद्धा डॉ. काणेंची वैशिष्ट्ये होती. भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता. विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणे, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते. 


वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. 1953 ते 1959 या काळात त्यांची नियुक्ती राज्यसभेवर करण्यात आली होती.  



1907 : मुंबईमध्ये विजेवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु झाली


ब्रिटिशांनी आपल्या काळात मुंबई हे महत्त्वाचे शहर म्हणून विकसित केले. शहराला असणारे नैसर्गिक बंदर लक्षात घेऊन ब्रिटीशांनी मुंबईला औद्योगिक शहराची ओळख दिली. त्याच वेळी ब्रिटीशांनी या शहरात पायाभूत सुविधांवरही लक्ष दिले. मुंबई शहरात सार्वजनिक वाहतुकीची साधनंदेखील मर्यादित होती. आजच्या दिवशी 1907 रोजी मुंबईमध्ये विजेवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु झाली. विजेवर ट्रॅम सुरू होण्याआधी घोड्यांच्या मदतीने ट्रॅम खेचली जात असे. विजेवर ट्रॅम सुरू झाल्याने प्रवास वेगवान, सुरक्षित झाला. 


2002 : जेष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत यांचे मुंबई येथे निधन


मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत यांचा आज स्मृतीदिन. आजच्या दिवशी त्यांचे मुंबईत निधन झाले. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलीभाषेची मांडणी आढळते. भावमुद्रा (1960), पैस (1970), डूब (1975), व्यासपर्व (1962) या ललितलेखनातून त्यांची कसदार निर्मिती दिसून येते. त्यांनी सामाजिक प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेवर वादही निर्माण झाले होते.


इतर महत्त्वाच्या घडामोडी: 


1948: मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्म


1955: एअर इंडिया ची मुंबई-टोकियो विमानसेवा सुरू झाली


1990: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


1994:  ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.


2001: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचे निधन.