Maharashtra Rain Live Updates : राज्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज, पाहा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Rain :  राज्यात सततच्या पावसाचं धुमशान सुरुच आहे. आतापर्यंत पावसामुळं राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jul 2022 06:45 PM
Aurangabad: जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Aurangabad News: वरील धरणातील आवक पाहता जायकवाडी धरणाच्या जलविद्युत केंद्रामधून गोदावरी नदीपात्रात 1589 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जायकवाडी धरण प्रशासनाने केला आहे. जायकवाडीत अजूनही 51 हजार 721 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. तर धरणाचा पाणीसाठा 78.14 टक्के झाला असून, जिवंत पाणीसाठा 1696.473 दलघमी एवढा झाला आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळी मुख्य दरवाज्यातून पाणी सोडण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरणाचा विसर्ग 6 वाजता बंद करणार

खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असणारा 856  क्युसेक विसर्ग  सकाळी 6 वाजता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.  पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

चंद्रपूर :

वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा राजुरा-बल्लारपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. इरई धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात देखील चार हा रस्ता दिवस बंद होता. बल्लापूर-राजुरा मार्ग, हा मार्ग बंद झाल्याने पुन्हा एकदा चंद्रपूर-तेलंगाणा वाहतूक ठप्प झाली आहे.

अकोला : अकोला - अकोट मुख्य रस्ता 18 तासांपासून बंद

अकोला - अकोट मुख्य रस्ता 18 तासांपासून बंद आहे. या मार्गावरील गांधीग्राम जवळील पूर्णा नदीला पूर आलाय. या पुरामूळ सध्या गांधीग्रामच्या पुलावरून 10 ते 12 फुट पाणी वाहत आहे. तर जिल्ह्यातील अकोट शेगाव अंदुरा मार्ग जोडणारा बंद आहे. पूर्णा नदीचा फटका या रस्त्याला बसलाय. अकोला जिल्ह्यात सुमारे 100 हून अधिक घरांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात अनेक भागात शेतात पाणी असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. सद्यस्थितीत लोकांना स्थलांतरित करावा असं कुठलेही वातावरण नाहीये. तरी नदीकाठच्या नागरिकांना गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Aurangabad: औरंगाबाद शहरात पुन्हा पावसाला सुरवात

Aurangabad Rain Update: गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज पुन्हा शहरातील काही भागात पावसाला सुरवात झाली आहे. शहरातील आकाशवाणी चौकात जोरदार पाऊस सुरु आहे. तर शहरातील इतर भागात सुद्धा कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

Nagpur : नागपूर विभागात सरासरी 14.2 मि.मी. पाऊस

नागपूर :  विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 14.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विभागात आज कोणत्याही तालुक्यात अतिवृष्टी झाली नाही. परंतु  नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विभागात चोवीस तासांत जिल्हानिहाय सरासरी  झालेला पाऊस कंसातील आकडेवारी आजपर्यंत  झालेल्या पावसाची आहे. वर्धा 48.4 (717.8), नागपूर 13.9 (621), भंडारा 6.1 (561.5) चंद्रपूर 5.2 (752.6), गडचिरोली 4.4(644.7) आणि गोंदिया 3.8(626.7), पाऊस झाला आहे. सर्व आकडेवारी  मिलीमीटर परिमाणात आहेत. नागपूर विभागात  दि 1 जून  ते 19 जुलैपर्यंत सरासरी 655.5 मि. मी. पाऊस पडला.

शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत. वर्धा आणि चंद्रपूरमधील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा





उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असणार आहे. 





वर्धा : मुसळधार पावसामुळे सहा तालुके बाधित

वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सहा तालुके बाधित झाले आहेत. यामध्ये वर्धा, आर्वी, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर हे तालुके बाधित झाले आहेत. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकूण 61 गावं बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित कुटुंबाची संख्या 1 हजार 303 इतकी आहे. तर 835 गावातील शेतीचं नुकसान झालं आहे. 63 हजार 325 हेक्टर वरील शेती बाधित झाली आहे. हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

अमरावती : घर कोसळून दोघांचा मृत्यू, गावकऱ्यांनी तिघांना वाचवलं

अमरावतीमधील चांदूरबाजार तालुक्यातील फुपगाव येथे घर कोसळल्याने पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. सकाळी सहा वाजता ही घटना घडली.  पाच जणांपैकी गावकऱ्यांनी तिघांना वाचविलं. पण दोन महिलांचा मात्र दबून मृत्यू झाला आहे.





अकोला : पावसाचे थैमान; नदीनाल्यांना पूर

अकोट, अकोला, तेल्हारा, बाळापुर, मूर्तिजापुर बार्शीटाकळी आणि पातुर या तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाचे थैमान; सर्वच नदी नाल्यांना पूर... 30 हजारावर हेक्टर शेतीला फटका, प्राथमिक अंदाज... अनेक मुख्य रस्ते पुरामूळे बंद...



  • संपर्क तुटलेली अन पुरानं वेढलेली गावं : झुरळ खुर्द 400 लोकवस्ती, रतनपुरी 350


खालील मार्ग बंद


अकोला-दर्यापुर रस्ता बंद; म्हैसांगच्या पूर्णा नदिला पूर, पुलावरुन पाणी... 


अंदुरा-अकोट-शेगाव मार्ग पूर्णपणे बंद; अकोट-अकोट मुख्य रस्ताहि बंद, गांधीग्रामच्या सात ते आठ फूट पुलावरून पाणी

अकोला : गांधीग्राम पुलावरुन 7 ते 8 फूट पाणी; अकोट-अकोला रस्ता बंद

अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीला मोठा पूर आला, या पुलावरून पाणी जात असल्याने अकोट-अकोला आणि अकोला-अकोट मार्ग बंद झाला. हा अकोला शहर आणि अकोट तालुक्याला जोडणारा मार्ग आहे. नागरिकांनी सदर मार्गावर प्रवास टाळावा जेणेकरून आपल्याला होणारा त्रास टाळता येईल. असे आवाहन दहिहांडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी केलं आहे. जसे जसे पाण्याचे प्रवाह कमी होईल तसं तसं पाणी खाली जाणार अन् मार्ग पुन्हा सुरु होणार असेही ते बोलले. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुकामधील पुर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे  उंची 30 सेमीने उघडले आहे, यातून विसर्ग 193 घ.मी.प्र.से. पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता अकोल्यातील गांधीग्रामच्या पूर्णा नदी पुलावरून तब्बल सात ते आठ फूट पाणी वाहत. सध्या प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


 





नागपूर : सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरलं

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील नांद गावात सोमवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. त्यानंतर गावातील सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरलं. चिखलयुक्त पाणी घरात शिरल्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांद ग्रामपंचायतीने सुमारे दीडशे लोकांना समाजभवनात हलवले आहे.

अमरावती-भातकुली-दर्यापूर मार्ग सुरु, वाहतूक धीम्या गतीने

सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील पेढी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीला पूर आल्याने अमरावती-भातकुली-दर्यापूर हा मार्ग सोमवारी दिवसभर बंद झाला होता. तसेच पुराचे पाणी भातकुली गावातील घरं आणि शेतात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. आज सकाळपासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अमरावती-भातकुली-दर्यापूर मार्ग आज सकाळी सुरू झाला असून काही ठिकाणी रस्ते खचल्याने वाहतूक मात्र धीम्या गतीने सुरू आहे.

भंडारा : पुरामुळे बेटावर अडकलेल्या सहा जणांची सुखरुप सुटका

मासेमारीकरता गेलेले सहा तरुण पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली. त्याच्या बचावासाठी SDRF चे एक चमू पाचरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची सुखरूप सुटका झाली आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील 25 ते 30 वृद्धांना सुरक्षित स्थळी हलवलं

अमरावतीत सोमवारी पेढी नदीला पूर आल्याने वलगाव जवळील पेढी नदीला लागून असलेल्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील 25 ते 30 वृद्धांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं. सोमवारी अमरावती जिल्ह्यात संततधार पावसाने पेढी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसला. सोमवारी सायंकाळी पावसाने मेळघाट वगळून विश्रांती घेतली पण आज सकाळपासून परत जिल्ह्यात कुठं रिमझिम तर कुठं संततधार पाऊस सुरु झाला आहे.





बुलढाणा : पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान

बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पात्रातील पाणी नदीकाठच्या शेकडो एकर शेतीत घुसल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नदीकाठच्या सोयाबीन, कापूस इत्यादी पिके पाण्याखाली गेली आहेत. अजूनही अकोला, अमरावती जिल्ह्यातील धरणातील विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात येत आहे. पुराची पाणीपातळी वाढत असल्याने धोका वाढला असून शेतीचं नुकसान वाढणार आहे. गेल्या आठ तासांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मात्र पूर परिस्थिती वाढती आहे.





वर्धा जिल्ह्यातील काही भागात गंभीर पूरस्थिती

वर्धा जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती गंभीर आहे. या भागात संततधार पाऊस पडत असल्याने धरणे ओसंडून वाहत आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून बचावकार्य सुरू आहे.





पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) नागपूरमध्ये रविवारी पावसाने दिवसभर उसंत घेतल्यानंतर त्याच रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले होते. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळालं.


विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा


विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिममध्ये बुधवारपर्यंत येलो अलर्ट आहे. तर वर्धामध्ये फक्त आज तर अमरावती आणि अकोलामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचे संकेत नसल्याचे हवामान खात्याच्या अहवालातून दिसून येत आहे. 




सर्वसामान्यांसह आता बळीराजाही कंटाळला

विदर्भात हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट असून त्यानंतर हळू हळू पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान नागपूर शहरात सोनवारी सकाळच्या सुमारास रिमझिम पावसानंतर काही वेळाच्या विश्रांतीनगर पुन्हा पाऊस सुरु झाला. दिवसभर आभाळ भरुन होते. दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसर जोरदार पाऊस बरसल्याने नागपुरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे रस्ते व चौक पुन्हा जलमय झाले होते. पाच आणि सहा जुलै वगळता नागपुरात 30 जूनपासून दररोज पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह आता बळीराजाही कंटाळून गेला आहे. शेतांमध्ये जागोजागी पाणी तुंबल्याने कामे रखडली आहेत. शिवाय अत्याधुनिक पावसामुळे पिकेही पिवळी पडू लागली आहे. पावसामुळे शहरवासीदेखील मेटाकुटीस आले आहेत. काही वस्त्यांमध्ये अजूनही तलाव साचले आहेत.


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.