Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rains) थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं कांदा, मका, भाजीपाला यासह फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.


बुलढाणा  जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, बळीराजा संकटात.


बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कांदा, मका, भाजीपाला, फळबाग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.


नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार


नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार घातला आहे. शहरासह जिल्ह्यातील बहुताशं भागात अवकाळई पावसानं हजेरी लावली. नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे बोगद्यात साचले पाणी साचले आहे. पाण्यातून मार्गस्थ होताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसात रेल्वे बोगद्याची ही परिस्थिती आहे. पावसाळ्यात तर या बोगद्याची काय परिस्थिती राहणार? असा सवाल नागरिक उपस्थिक करत आहेत. गेल्या 4 वर्षापासून या ठइकाणी काम सुरुच आहे. अद्यापही काम पूर्ण झालं नाही. खांडबारा रेल्वे बोगदाच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या भुयाराजागी तलाव तयार झाला आहे. दरम्यान, या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. 


धार्मिक कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप वादळी वाऱ्याने कोसळला


नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एका धार्मिक कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप वादळी वाऱ्याने कोसळला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही . महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त मुखेड तालुक्यातील दापका राजा येथे शरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक जमले होते. धार्मिक गुरु आणि अन्य मान्यवर येण्यापूर्वी येथे वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे या कार्यक्रमासाठी उभारलेला मोठा मंडप वाऱ्यानं कोसळला. यामुळं खुर्च्या देखील तुटल्या आहेत. सुदैवाने यात भाविकांना कोणतीही ईजा झाली नाही. पाऊस, वारा आणि मंडप कोसळल्यानं कार्यक्रम रद्द करावा लागला.


अवकाळी पावसाचा लग्नकार्यातही अडथळा 


हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. वाकोडी इथे असाच एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्याने चक्क छत्रीखाली नवरा नवरीचे लग्न लावण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती. हिंगोली जिल्ह्यातील वाकोडी येथे वानखेडे आणि घोलप परिवारातील लग्नसमारंभ होता. परंतु, अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच लग्न तर उरकणे गरजेचे होते. त्यामुळं गावकऱ्यांनी भन्नाट आयडिया शोधत चक्क नवरा नवरीचे लग्न छत्री खाली लावले. दरम्यान, या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे.