Kalyan News: कल्याण ग्रामीण भागातील कांबा गावात असलेली विहीर चोरीला गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिली आहे. या तक्रारीत विहिरीच्या जागी इमारती उभारल्याचे म्हटले आहे. या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामसेवक, उपसरपंच यांनी संबंधित तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणी संबंधितांना नोटीस पाठवल्याचे सांगितले. तर, दुसरीकडे याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिक अल्विन यांनी या विहिराचा कुणी वापर करत नव्हतं आणि विहीर धोकादायक झाली होती. ग्रामपंचायतही डागडुजी करत नव्हती. त्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर विहीर बुजवली असल्याचे सांगितले.
कल्याण तालुक्यातील कांबा गावातील ग्रामस्थांनी तक्रार नोंदवल्यानंतर ही बाब समोर आली आहे. 'चोरीला' गेलेली ही विहीर 50 ते 60 वर्ष जुनी आहे. नंतरच्या काळात विहिरीचा वापर कमी प्रमाणात होत असला. तर, काही वर्षापूर्वी ही विहीर ग्रामस्थांची तहान भागवत होती. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने ही विहीर बुजवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुनंदा पाटील यांनी या विहिरी बाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला असून संबंधित बांधकाम व्यावसायिक नोटीस पाठवण्यात आली आहे पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
बांधकाम व्यावसायिक अल्विन यांनी ही विहीर आमच्या सातबारा जागेवर होती, असा दावा केला आहे. विहीर 12 वर्षांपूर्वी ग्रामस्थ वापरत होते. मात्र, विहिरीत एका महिलेने आत्महत्या केल्यानंतर ही विहीर कुणी वापरत नव्हतं. हा पूरग्रस्त भाग असल्याने या ठिकाणी विहिरीपेक्षा उंचीवर बांधकामे झाली आहेत. ही विहीर जुनी असल्याने तिच्या भिंती पडल्याने धोकादायक झाली आहे. ग्रामपंचायतीने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं. याबाबत आम्ही प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आठ महिन्यांपूर्वी प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही विहीर बुजवली असल्याचे अल्विन यांनी म्हटवले. कुणी या विहिरीवर पाणी भरण्यासाठी येत नव्हते, आठ महिने कुणी तक्रार केली नाही. मात्र पैसे उकळण्याचा हेतूनं जाणून बुजून खोटे आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले.
ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सोनाली उबाळे यांनी याबाबत ग्रामस्थांसह मी स्वतः ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज केला असल्याचे सांगितले. मात्र, अद्याप काहीच कारवाई करण्यात नसल्याचे सांगितले. उपसरपंच या घटनेबाबत पोलीस ठाण्यामध्ये विहीर चोरी झाल्या बाबत तक्रार देणार आहे.