Nashik Child Trafficking : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकसह (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेला बाल तस्करी प्रकरणाचा तिढा अखेर सुटलेला आहे. नाशिकच्या मनमाड येथून ताब्यात घेतलेल्या मुलांना पुन्हा बिहारला माघारी पाठविण्यात आले आहे. आज सकाळी नाशिकरोड येथून रेल्वेच्या माध्यमातून सदर मुलांना गावी रवाना करण्यात आले. त्यामुळे मुलांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बिहारमधून (Bihar) सांगलीच्या निवासी (Sangli) मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या 59 अल्पवयीन मुलांना धावत्या रेल्वेतून रेल्वे पोलिसांनी (Railwat Police) भुसावळ (Bhusawal) व मनमाडमध्ये रेस्क्यू केले होते. यापैकी भुसावळ येथून 29 मुलांना बालकल्याण समितीमार्फत बिहारला पाठविण्यात आले आहे. उर्वरित तीस मुले नाशिकच्या (Nashik) बालसुधारगृहात होती, आता या बालकांना देखील बिहारला रवाना करण्यात आले आहे. या बालकांसाठी रेल्वेचे आरक्षण तर रेल्वे स्थानकांपर्यत पोहचवण्यासाठी पोलिसांचा एस्कॉर्ट, वैद्यकिय कर्मचारी सोबत देण्यात आला होता. तत्पूर्वी नाशिक जिल्हा बाल कल्याण समितीकडून अरारिया बाल कल्याण समितीमार्फत मुलांची खात्रीशीर माहिती घेण्यात आली होती. त्यानंतर सर्व मुलांना आज सकाळी अकरा वाजता रेल्वेद्वारे रवाना करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्या पद्धतीनेच नाशिकच्या बालकल्याण समितीकडून अरारिया बालकल्याण समितीकडे संपर्क साधण्यात आला. तिथून बिहारच्या अरारिया आणि पूर्णीया जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या तीस मुलांची माहिती जाणून घेत तपासणी करून खात्री पटवली. जोपर्यंत तेथून सर्व मुलांची माहिती प्राप्त होत नाही, तोपर्यंत नाशिक जिल्हा प्रशासनाला मुलांना पाठविता येणार नसल्याचे भूमिका प्रशासनाने घेतलेली होती. त्यानंतर आता सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मुलांना पालकांसमवेत रेल्वेद्वारे पाठविण्यात आले आहे.
दोन टीम थेट अररियापर्यंत पोहोचल्या...
एक स्वतंत्र रेल्वेचा डबा या मुलांसाठी आरक्षित असून त्यांच्यासोबत दोन मुख्य टीम्स आहेत. त्याचबरोबर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, संस्थानमधील काळजीवाहक, चाईल्डलाईन टीम देखील सोबत असणार आहे. तसेच एक टीम अररिया येथील मुलांसोबत, तर दुसरी टीम पूर्णियायेथील बालकांसोबत असणार आहे. येथील बाल कल्याण समितीसमोर या बालकांना हजर करण्यात येणार असून त्यानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वी बाल तस्करीच्या हेतूने रेल्वेने प्रवास करणाऱ्या 59 बालकांना भुसावळ रेल्वे स्थानकावर आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. यानंतर मानवी तस्करीचे प्रकरण म्हणून राज्यभरात गाजलं. या मानवी तस्करी प्रकरणात भुसावळ रेल्वे पोलिसांनी (Bhusawal Railway Police) 29 मुलांना बाल निरीक्षण गृहात ठेवलं होतं. तर नाशिकच्या बाल सुधारगृहात 30 बालकांना ठेवण्यात आले होते. बालकांना नेण्यासाठी बिहारहून त्यांचे पालक काही दिवसांपूर्वी नाशिकसह जळगावला पोहचले होते. मात्र पालकांकडे बालकांना सुपूर्द करण्यास नकार देण्यात येत होता. सर्व खात्रीशीर माहिती संकलित केल्यानंतर आज सकाळी अकरा वाजता मुलांना बिहारला रवाना करण्यात आलं आहे.