Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसापासून पावसानं चांगलीच ओढ दिली होती. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी पीकं माना टाकू लागली होती. अशा पिकांना आता जीवदान मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर वाशिम, नंदुरबार, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.
वाशिम जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु
वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलाला मिळाला आहे. खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर होती. त्या पिकांना पावसामुळं जीवदान मिळालं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला होता. नवापूर तालुक्यातील खोकसा-चिंचपाडा या रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्यात वाहून गेल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील ग्रामस्थांना पाण्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे.
पुण्यात पावसाची हजेरी, वातावरणात गारवा
पुण्यात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रस्त्यांवर पुन्हा एकदा छत्र्या आणि रेनकोट बघायला मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं ओढ दिली होती. त्यामुळे हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती बघायला मिळणार आहे.
मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, भांडुप, मुलुंड या सर्व विभागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे एलबीएस मार्गावर सखल भागात पाणी भरले आहे.
नाशिकमध्येही पावसाची जोरदार हजेरी
नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात चणकापूर,आंबुर्डी,जामशेत, अभोणा आदी भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन, मका आदी शेती पिकांना जीवदान मिळणार आहे. कळवण परिसरातील जामशेत येथे जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले वाहू लागले आहेत.
मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सखल भागात पाणीच पाणी
एक ते दीड तास पावसाने धुमाकूळ घातल्याने भिवंडी शहरातील काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर अनेक सखल भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळं शहरातील सखल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळं भिवंडी शहरातील मुख्य भाजी मार्केटमध्ये दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचले होते.
महत्त्वाच्या बातम्या: