Maharashtra Rain : देशभरात मान्सून दाखल झाला आहे. सध्या देशातील विविध राज्यात पाऊस बरसत आहे. महाराष्ट्रातही काही भागात चांगला पाऊस पडत आहे. मात्र, अद्याप अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. हवा तेवढा पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच कोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान विभागानं आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वसई विरारमध्ये जोरदार पाऊस
वसई विरार नालासोपाऱ्यात जोरदार पाऊस पडला. यामुळं काही सखल रस्त्यावरील पाणी साचलं आहे. पाण्यातून दुचाकी चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वसई विरार महापालिकेने पावसाळ्या पूर्वी शहरातील अनेक गटारचे काम सुरू केले आहेत. अनेक गटाराचे काम अपूर्ण आहेत तर अनेक गटार हे रस्त्या पेक्षा उंच झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही.
नाशिकमध्येही पावसाची हजेरी
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे कमबॅक झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून यंदा काहीअंशी दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर दुसरीकडे नाशिककरांच्या पाणी कपातीचे संकटही टळले आहे.
जत तालुका दुष्काळी जाहीर करावा
जत तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी जत तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडी घटक पक्षातील नेत्यांनी जत तालुका दुष्काळी जाहीर करावा ही मागणी करत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करून द्यावे, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे आदी मागण्यां या आंदोनलाच्या माध्यमातून करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या: