Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी घरांमध्ये, दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. तसेच रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. याचबरोबर शेती पिकांना देखील या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसानं हिरावून घेतला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 


राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. पुण्यात झालेल्या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच नाशिक, बीड, अकोला, बारामती, अहमदनगर या भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 


पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप


पुणे जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारापर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पाणी लागलं आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे. नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांचा चांगलीच धावपळ झाली. अनेक भागात पाणी शिरलं आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.


नाशिकच्या ग्रामीण भागाला पावसानं झोडपलं, सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस


नाशिकच्या ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सिन्नर तालुक्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळं रात्री नागरिकांचे हाल झाले. घरात पाणी शिरेल या भीतीनं अनेकांनी रात्र जागून काढली. रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलंआहे. तसेच शेतात पाणी साचलं आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून  नाल्यामधून पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मागील महिन्यात ही ढगफुटीसदृश पावसानं कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाल्यानं नुकसान भरपाईची मागणी ग्रामस्थ करत आहेत.


बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस, कापूस पिकाचं मोठं नुकसान


मराठवाड्यासाठी परतीचा पाऊस वरदान ठरत असतो. मात्र, यावर्षी हाच पाऊस शेतातील उभ्या पिकांचं नुकसान करणारा ठरलाय. म्हणूनच नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर जाऊन केजमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. बीड जिल्ह्यात शंभर टक्के पिक विमा लागू करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची शासनाने मदत करावी, आशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुडं यांनी केली आहे. जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) तालुक्यात रात्रभर जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं कापसाचं (Cotton) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कापसाच्या शेतात गुडाघाभर पाणी साचल्यानं पिक पूर्णत: पाण्याखाली गेलं आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून बळीराजा संकटात सापडला आहे.


दिवाळीपूर्वीच सरकारनं तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा


बीड जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी गेवराई तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसानं कापसाच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पूर्ण कापूस पीक पाण्याखाली गेलं आहे. लाखो रुपये खर्च करुन शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगवलं होतं, त्यातच आठ दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळं कापसाची बोंड काळी पडली असून, त्यामधून काहीच उत्पन्न मिळणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळं दिवाळीपूर्वीच तत्काळ सरकारनं ओला दुष्काळ बीड जिल्ह्यात जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.


बारामती तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी


बारामतीतून वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. काल पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने नाझरे धारणातून 35 हजार क्यूसेकने पाणी कऱ्हा नदीत सोडण्यात आले आहे. तसेच ओढा, नाल्याचे पाणी देखील कऱ्हा नदीत येत असल्याने कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळं सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. बारामतीतील शहरातील साठेनगर, आंबेडकरनगर खंडोबानगर या परिसरात नागरिकाच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. बारामतीतील 50 पेक्षा जास्त घरांमधे पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. जवळपास 35 कुंटुबाचे स्थलांतरण करण्यात आलं आहे. तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, 1 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान


अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. रात्री झालेल्या पावसानं शहरातील सखल भागात पाणी साचले होतं. तर शहरातून वाहणारी सिना नदी दुथडी भरून वाहत आहे. परतीच्या पावसानं शेती पिकांचे मोठं नुकसान झालं असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर देखील याचा परिणाम होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 120 टक्के पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसामुळं प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 


अकोला जिल्ह्यात पावसाची हजेरी


अकोला जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार महान येथील काटेपुर्णा प्रकल्पाचे संपुर्ण दहाही दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सकाळी 11.15 वाजता हे सर्व दहा दरवाजे 30 सेंटीमीटरने वाढवण्यात आले होते. यात 254.829 घनसेंटीमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. काटेपुर्णा प्रकल्प सध्या 100 टक्के भरला आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या आठवडाभरात जोरदार पाऊस झाला आहे. यात धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणाचे दरवाजे उघडल्यानं पुर्णा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही राज्यात पावसाचा यलो अलर्ट