Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Apr 2023 08:45 AM
Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस 

Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, विलेपार्ला, जोगेश्वरी गोरेगाव परिसरात सध्या गेल्या पंधरा मिनिटांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. 

Rain News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, जगप्रसिद्ध अजिंठा येथील वाघूर नदीला पूर

Rain News : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने जगप्रसिद्ध अजिंठा येथील वाघूर नदीला पूर आला आहे. मागच्याच महिन्यात अवकाळी पावसामुळं नदी वाहू लागली होती. काल झालेल्या सर्वदूर पावसानं लेणीतून वाहणाऱ्या या नदीला पूर आलेला पाहायला मिळालं


 

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : भर उन्हाळ्यात महाराष्ट्रावर ओढवलेले अवकाळी पाऊस (unseasonal rain) आणि गारपीटीचे संकट अजूनही संपलेले नाही. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळं मराठवाड्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


अवकाळी पावसामुळं मराठवाड्यात 10 जणांचा मृत्यू 


नांदेडमध्ये गारपीटीच्या तडाख्यानं शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या तीन दिवसात या विभागातील 10 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर 10 जणांचे बळी गेले आहेत. फेब्रुवारीपासून राज्यावर हे अवकाळी संकट ओढावलं आहे. भर उन्हाळ्यात एप्रिलच्या 28 दिवसांपैकी 5 दिवस मध्यम ते जोरदार व इतर 14  दिवसांत हलक्या पावसाची नोंद झाली. एप्रिलमध्ये मराठवाड्यात सरासरी 3.6 मिमी अवकाळी पाऊस अपेक्षित असतो. यंदा प्रत्यक्षात 33.6  मिमी म्हणजे 93.03 टक्के पावसाची विक्रमी नोंद झाली. 


अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विदर्भ, मध्य प्रदेशकडून जाणारा राष्ट्रीय महामार्गावर कापसाची गाठी घेऊन जाणारा ट्रक अचानक रस्त्यावर अचानक पलटी झाला आहे. त्यामुळे ट्रकमधील कापसाच्या गोण्या या पावसात भिजल्यामुळे त्याचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर तालुक्यातील सुकळी गावानजीक महामार्गावर ही घटना घडली आहे. 


लातूरच्या तीन मंडळात 65 मिलिमीटर हून अधिक पावसाची नोंद


लातूरच्या तीन मंडळात 65 मिलिमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर नांदेड (28 मिमी), हिंगोली (14.3 मिमी), उस्मानाबाद (13.9 मिमी), बीड (12.7 मिमी), जालना (7.8 मिमी), परभणी (4.9 मिमी), औरंगाबाद (4.9 मिमी) पावसाची नोंद झाली आहे. 


मराठवाड्यातील 153 गावांना फटका


अवकाळी पावसामुळं मराठवाड्यातील 153 गावांना फटका बसला आहे. बाधित झालेल्या 153 गावांमध्ये जालन्यातील 101, हिंगोलीतील 38 आणि उस्मानाबादमधील 14 गावांचा समावेश आहे. नांदेडमध्ये सहा, लातूरमध्ये दोन आणि उस्मानाबाद आणि बीडमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या 72 तासांत एकूण 1,178 कोंबड्या, 147 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळं 8058.66 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून 14,441 शेतकरी बाधित झाले आहेत. नांदेडमध्ये 5726.70 हेक्‍टर, त्यानंतर जालना 2016.96 हेक्‍टर, हिंगोली 165 हेक्‍टर आणि परभणी 150 हेक्‍टर क्षेत्र प्रभावित झाले आहे.


सोलापूर जिल्ह्यात शेती पिकांना मोठा फटका


संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूरला अक्षरशः झोडपलं आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा इत्यादी तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सोलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. यामुळं काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. अग्निशमन दलाचे जवळपास वीस जवान मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते. महावितरणच्या विद्युत यंत्रणाचे मोठे नुकसान देखील या अवकाळीने केले. शहरात 20 ठिकाणी विजेचे खांब पडले तर जवळपास 70 ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या. त्यामुळे सोलापुरातल्या अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला. महावितरणने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन रात्री 11 वाजेपर्यंत 80 टक्के विद्युत पुरवठा सुरळीत केल्याचा दावा केलाय. ग्रामीण भागात झालेल्या पावसाने शेतीचे देखील नुकसान झाले आहे. आंबा, केळी, पपई, डाळिंब सारख्या फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Marathwada: मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान; पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.