चंदीगढ: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी झालेल्या मतमोजणीवेळी अत्यंत रंजक परिस्थिती पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस पक्षाने 60 जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात सत्ता स्थापन करणार, असे संकेत मिळत होते. त्यामुळे दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनची तयारी सुरु केली होती. याठिकाणी काँग्रेसने जिलेबी वाटायला सुरुवात केली होती. मात्र, सुरुवातीला दीड तास उलटल्यानंतर हरियाणातील मतमोजणीत एक ट्विस्ट आला. सुरुवातीच्या तासाभरात 30 जागांचीही वेस न ओलांडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारत आता 50 जागांपर्यंत आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीच्या टप्प्यात 60 जागांवर आघाडी घेतलेल्या काँग्रेसची 35 पर्यंत घसरण झाली आहे. हरियाणा विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्याच्या पुढे आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकते.
भाजपने मतमोजणीत केलेले पुनरागमन हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून हरियाणात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असल्याची चर्चा होती. याशिवाय, शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंचे आंदोलन हाताळण्यात भाजपला आलेले अपयश यामुळे भाजपला हरियाणात फटका बसेल, असे बोलले जात होते. मात्र, मतमोजणीचे सध्याचे कल पाहता भाजपने ही सर्व आव्हाने पार करत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे दिसत आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला झुकते माप देण्यात आले होते. काँग्रेस राज्यात एकहाती सत्ता स्थापन करेल, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता भाजप हरियाणात पुन्हा सत्तेत येईल, असे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील यश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उत्साह वाढवणारे ठरु शकते. आता मतमोजणीच्या पुढील काही तासांमध्ये हे कल बदलणार का, हे पाहावे लागेल. मात्र, अनुकूल परिस्थिती असताना काँग्रेसचा पराभव झाल्यास पक्षासाठी तो मोठा धक्का ठरेल. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्यास राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. हरियाणात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला का, हेदेखील आता पाहावे लागेल.
हरियाणा विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल:
मॅट्रिझ एक्झिट पोल
काँग्रेस - 55 -62
भाजप - 18-24
JJP -0-3
OTH -02 -05
दैनिक भास्करचा एक्झिट पोल
काँग्रेस - 44-54
भाजप - 15-29
INLD+ - 01-05
OTH - 06-09
आणखी वाचा
Haryana Vidhan Sabha 2024 Result Live : मोठी बातमी! हरियाणात जुलाना जागेवरून विनेश फोगाट आघाडीवर