Maharashtra Rain Live Updates : काही भागात पूरस्थिती, तर काही भागात पावसाची विश्रांती, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Maharashtra Rain Live Updates : महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. काही भागांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे, तर काही भागांत पावसानं विश्रांती घेतली आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात विविध गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याबाबत मेरी येथील संशोधन केंद्रात त्याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे तहसीलदार पंकज पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली आहे. याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.
Nashik Rain : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व गंगापूर पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाल्याना काही प्रमाणात पूर आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने उद्या सकाळी 6 वाजता 3000 क्युसेकने गंगापूर धरणातून विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुंबईला पावसानं झोडपलं आहे. मुंबईत पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात पावसाची हजेरी लागली आहे.
भंडारा, गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आमगाव इथून जाणाऱ्या नाल्यावर पाच फूट पाणी आल्यानं रस्ता बंद झाला आहे, पुरामुळे नागरिक अडकले आहेत. वैनगंगा नदीला पूर आला आहे.
मुंबईला आज पहाटेपासून पावसानं झोडपलं आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात झालेला मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे लाखांदूर तालुक्यातील वाहणाऱ्या चूलबंद नदीवरील सर्व पुल पुराच्या पाण्याखाली आले आहेत. यात लाखांदूर, भागडी चीचोली, मांढाल दांडेगावर, बोठली धरमापुरी, ताई बार्व्हा, दिघोरी मोठी पालांदुर पुलाचा समावेश असून प्रत्येक पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने तालुक्यातील अनेक गावांची वाहतूक ठप्प झाली आहे, तर लाखांदूर ते वडसा या राष्ट्रीय महामार्गावरील चाप्राळ ते सोनी रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने भंडारा ते गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. तर लाखांदूर तालुक्यातील आवली, पारसोडी,पाऊलाडवणा, या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून पुराचा धोका वाढलेला आहे. चुलबंद नदीच्या पुलावर पुराचे पाणी चढल्याने पुल पाण्याखाली आले आहे. त्यामुळे लाखांदूर ते पवनी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. गावाला पुराच्या पाण्याने वेढले असून अनेक घरे पाण्याखाली आले आहे. तालुका प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही गावाला वैनगंगा नदीच्या पाण्याचा वेढा घातला आहे. ब्रम्हपुरी तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. तसेच वैनगंगेच्या पाण्यामुळे गांगलवाडी-मुडझा रोड पूर्णपणे बंद झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बाम्हणी अंतर्गत झाशी नगर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यास कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी जीवनदान दिलं आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकरी रामलाल मोडकु सलामे हे काल (सोमवारी) कुटुंबातील सदस्यांसह शेतात असलेल्या घरी होते. झाशी नगर नजीक असलेल्या नाल्याला मुसळधार पावसामुळं अचानक पूर आला. पुराच्या पाण्यानं पाहता पाहता संपूर्ण घराला वेढा दिला. गावातील युवा शेतकरी महेंद्र चुटे हे दुध संकलन करण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ गावातील शेतकरी गटाच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर सदर घटनेची माहिती दिली. तात्काळ गटातील शेतकरी, कृषि सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेतली. युवा शेतकरी गटाचे सदस्य यांना कुटुंबातील 3 सदस्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं
मुंबईत मध्र्यरात्रीपासून रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मुंबईत काही भागात अधूनमधून रिमझिम पाऊस सुरु असल्यानं वातावरण थंड आहे. मंगळवारी सकाळीही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. मुंबईत रस्ते वाहतुक सुरळीत सुरू आहे. तसेच तिन्ही मार्गावरच्या रेल्वे देखील सुरळीत सुरू आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतलीआहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, आज काहीसा पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज आणि उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसारत राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. सध्या धरणांमधून नद्यांमध्ये विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
औरंगाबादमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी
औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर शहरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आहे. तर वाळूज जवळील लिंबेजळगाव-तुर्काबाद परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सोबतच शहरात सुद्धा काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पातळी 30 फुटांवर गेली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सांगली शहराच्या सूर्यवंशी आणि आरवाडे प्लॉट या पूर पट्ट्यामधील सहा कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. सूर्यवंशी प्लॉट मधील दोन घरात पाणी घुसले आहे. आणखीन पाण्याची पातळी वाढली तर सांगलीच्या विस्तारित भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरपट्ट्यातील नागरिकांनी स्वतः हुन सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे, असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी जनतेला केले आहे. पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धोका पत्करु नये असे आवाहन केले आहे.
उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरु
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहेत. धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्याच्या परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाच्या संततधारेमुळे उजनी (Ujani) आणि वीर धरण (Veer Dam) ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत 50 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उजनी आणि वीर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरु असल्यानं पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवल आले आहे. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीमुळं प्रशासनाने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -