Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy Rain) हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसानं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेती पिकांचे मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यातील, हिंगोली, वाशिम, पालघर, यवतमाळ लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या जिल्ह्यातील शेती पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचं तर काही भागात काढलेल्या सोयाबीनसह कापूस पिकांचे नुकासन झालं आहे. याबाबत प्रशासनानं तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यवतमाळ जिह्यात परतीच्या पावसाची सर्वदूर हजेरी, सोयाबीन आणि कापसाचं नुकसान
यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह पावसानं हजेरी लावली आहे. आज पहाटेपासूनच कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस पडत आहे. उमरखेड, महागाव, आर्णी, पुसद आणि दारव्हा या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यानं काढनीला आलेलं सोयाबीन आणि वेचणीच्या तोंडावर असलेल्या कापूस पिकांचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोंगणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात सापडलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. जिह्यात सर्वाधिक पाऊस पुसद तालुक्यात झाला आहे. 24 तासांमध्ये 44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आर्णी तालुक्यात 42 मिलीमीटर तर उर्वरित यवतमाळ बाभूळगाव, कळंब, पांढरकवडा, घाटंजी, झरीजामनी आणि वणी तालुक्यातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे.
लातूर जिल्ह्यात संततधार पावसामुळं पिकांचं नुकसान वातावरणात गारवा
रात्रीपासूनच लातूर शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पाउस पडत होता. सकाळी काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. या सततच्या पावसामुळं सोयाबीनच्या काढणीला आलेली सोयाबीन पिकं धोक्यात आली आहेत. या पावसामुळं वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. लातूर शहर, लातूर ग्रामीण, किल्लारी, औसा तसेच निलंगा तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
वाशिम जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
वाशिम जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मानोरा तालुक्यातील चौसाळा या गावामध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बंधारा फुटून तसेच तुडुंब भरुन शेतात पाणी शिरल्यानं शेतीच्या पिकांचे अधिक नुकसान झालं आहे. चौसाळा ते दापुरा चौसाळा ते म्हसणी या रस्त्यावर दोन्ही पुलाचे नुकसान झालं असून गावात येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी
बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिप्र सुरु होती, मात्र सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, बुलडाणा आणि चिखली तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले सोयाबीन यामुळे पूर्णतः भिजलेला असून शेतकरी मात्र या पावसाने चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असून जिल्ह्याच्या अर्ध्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
पालघर जिल्ह्यात हळव्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान
पालघर जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हळव्या भात पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पिकून आलेलं हळवे भात पीक रात्री झालेल्या अचानक पावसामुळे पूर्णपणे आडवं झालं आहे. यामुळं मोठा फटका बसला आहे. डहाणू वाडा विक्रमगड जव्हार भागातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे 75 हजार हेक्टरवर पावसाळ्यात भात शेती केली जाते. यामध्ये हळवी आणि गर्वी अशी दोन पिकं घेतली जातात. सध्या हळवी भात पूर्ण पिकून आला असतानाच जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी, शेती पिकांचं मोठं नुकसान
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील ढवळस (Dhavalas) परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणची वाहतुक बंद करण्यात आली आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच करमाळा तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं तिथेही शेती पिकांचे नुकसान झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Madha Rain News : माढ्यासह करमाळा तालुक्यात तुफान पाऊस, ढवळसमध्ये ढगफुटी, शेती पिकांचं मोठं नुकसान