Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये शहर शिवसेना प्रमुखासह त्यांच्या दोन मुलांसह चौघांवर प्राणघातक खुनी हल्ला झाला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडला. हल्ल्यात चाकू, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या शहर प्रमुखावर असा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


प्रमोद सावंत, रोहित सावंत, प्रमोद दरेकर, प्रदीप दरेकर यांच्यासह दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिवसेना शहर प्रमुख असलेले संजय चव्हाण यांनी प्रमोद सावंतकडे उसने दिलेले पैसे मागितले. यावेळी सावंतने चव्हाण यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सावंत याला जाब विचारण्यासाठी चव्हाण यांची मुले अभिषेक व पवन हे त्याठिकाणी आले. यावेळी वादावादीस सुरुवात झाली. हा वाद मिटवण्यासाठी चव्हाण हे पुढे आले. यावेळी प्रमोद सावंतने चव्हाण यांना उद्देशून 'कसले पैसे मागतोस, तुला आलेले पैसे पक्षाचेच आहेत, तुला दाखवतोच, आज तुम्हाला जिवंत ठेवत नाही', अशी धमकी दिली.   


याचवेळी प्रमोद सावंतसोबत आलेल्या रोहित सावंतने संजय चव्हाण यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटावर वार केला. चव्हाण यांनी तो वार वाचवला. त्यानंतर रोहित याने केलेला वार चव्हाण यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला लागला. याचवेळी प्रदीप दरेकरने लोखंडी रॉडने चव्हाण यांच्या डोक्यात मारले. यावेळी चव्हाण यांना वाचवण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा अभिषेक यालाही प्रमोद दरेकर व अन्य एका अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारले


चव्हाण यांचा दुसरा मुलगा पवन यालाही अनोळखी व्यक्तीने लोखंडी रॉडने मारले. तसेच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या किरण साळुंखे यांना प्रमोद सावंतने डाव्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या