मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा (Maharashtra School) या सकाळी 9 वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.  त्यामुळे आता सर्व शाळांना शासन निर्णयानुसार आपल्या शाळा भरवण्याचा नियोजन करावे लागणार आहे. 


अलिकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये रात्री उशीरा जागण्याचा कल वाढत असल्याचं दिसून येतंय. त्यात सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप होत नाही आणि परिणामी मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसून येतंय. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला. 


राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला.


सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिक उपलब्ध करून देण्यात आली होती.


गुगल लिंकवरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ आणि पालक यांच्याशी चर्चा केली असता, प्राधान्याने खालील महत्वाच्या बाबी रागोर आल्या आहेत आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्यात शालेय शिक्षण विभाग कडून सांगण्यात आले 


1. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी ७ नंतर असल्याचे दिसून येते.


2. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.


3. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लगकर उठण्यासाठी तयार नसतात.


4. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात, त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो.


5. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात.


6. राकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते.


7. सकाळी लवकर भरणान्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हेंत द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.


शाळेच्या वेळा बदलण्याची राज्यपालांनी केली होती सूचना 


गेल्या वर्षी मुंबईतील 'मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा'  या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी राज्यपाल बैस यांनी या विषयावर वक्तव्य केलं होतं.बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलेल्या असून रात्री उशिरा झोपण्याकडे सर्वांचा कल वाढलेला आहे. रात्री उशिरा झोपण्याच्या संस्कृतीमुळे शाळांची वेळ सकाळची असणे हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु लागलेले आहे असं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यामुळे शाळेची सकाळची वेळ बदलण्यासंदर्भात विचार करावा असं ते म्हणाले होते. 


ही बातमी वाचा: