पुणे : महाराष्ट्रामध्ये मी केलेल्या सर्व्हे मध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाला राज्यातील 48 जागा मिळत असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये वाकडला डिफेन्स एक्स्पोला त्यांनी भेट दिली. त्या नंतर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केलाय. संजय राठोड यांना चित्रा वाघ यांचा विरोध असला तरी तो वाद वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल, असंही ते म्हणाले. अजित पवार यांना पक्ष मिळाला ही लोकशाहीमधील एक प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले.


पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातला एकही प्रकल्प गुजरातमध्ये गेला नाही. काही लोक हे नरेटीव्ह सेट करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. उलट गुजरातचे प्रकल्प राज्यात येत आहे, असंही ते म्हणाले. अजित पवार यांना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. मात्र त्यासंदर्भात अनेक आरोप होताना दिसत आहे. हा निकाल जर शरद पवार गटाकडून लागला असता तर ते काहीही बोलले नसते. निकालात त्यांचा पराभव झाल्यामुळे आरोप सुरु आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


पुणे इंटरनॅशनल प्रदर्शन आणि कनव्हेन्शन सेंटर यांच्यावतीने 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत मोशी येथे होणाऱ्या महाराष्ट्र एमएसएमइ डिफेन्स एक्स्पोच्या पूर्वतयारीचा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला.यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उद्योग संचालनालयाचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह,  पीएमआरडीएचे राहूल महिवाल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपीन शर्मा उपस्थित होते.


उद्योगमंत्री सामंत म्हणाले, या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोजनामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. प्रदर्शन यशस्वी करणे ही सर्व विभागांची सामुहिक जबाबदारी आहे. या प्रदर्शनामध्ये 468 स्टॉल लावण्यात येणार असून आत्तापर्यंत 300 उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र एक प्रमुख केंद्र बनवण्यासाठी शासन वचनबद्ध असून या प्रदर्शनामुळे लघु व मध्यम उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल, असेही सामंत म्हणाले.


उद्योगमंत्री सामंत यांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी करावयाचे वाहतूक नियमन, वाहनतळ व्यवस्था, प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, हेलिपॅड आदी सुविधांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, आरोग्य, अग्निशमन, महावितरण, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.


इतर महत्वाची बातमी-


Hemant Patil : कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी; शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार