Maharashtra Rain LIVE Update : मराठवाड्यासह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain : महाराष्ट्रातह मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 May 2022 09:04 PM
Washim Rain Update : वाशिमच्या मालेगाव तालुक्यासह शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी 

वाशिमच्या मालेगाव तालुक्यासह  शहरात आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसाने काही प्रमाणात गावरान आंब्यासह फळपिकांना फटका बसला आहे.  


  

Yavatmal Rain : यवतमाळमध्ये गारांचा पाऊस
Yavatmal Rain :  मागील दोन दिवसापासून जिल्ह्यामध्ये ढगाळी वातावरण होते. आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कडक उन्ह तापल्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने सुरुवात झाली.  सुरुवातीला हलक्या स्वरूपात गाराही पडल्या. मागील अर्धातासापासून पाऊस पडत असून नागरिकांना उकड्यापासून सुटका मिळाली आहे. दरम्यान अर्धा ते पाऊणतास पावसाने जोरदार हजेरी लावली.

 

 
Yavatmal Rain : यवतमाळ शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात

Yavatmal Rain : यवतमाळ शहरात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. 

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गातील वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस

 Sindhudurg Rain : कोकणातही मान्सूनपूर्व पावसानं काल हजेरी लावली. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसला. काल झालेल्या पावसामुळे आंबोली घाटात धुक्याची चादर पसरली होती. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला. राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील  गावे गेल्या 12 तासांपासून अंधारात आहेत. महावितरणकडून सध्या दुरुस्तीचं कामं हाती घेण्यात आली आहेत

 Pandharpur News : पंढरपुरात पावसामुळं बेदाणा आणि शेवग्याचं मोठं नुकसान

 Pandharpur News : पंढरपुरात वादळी वारे आणि पावसामुळं बेदाणा आणि शेवग्याचं मोठं नुकसान झालं. अचानक आलेल्या पावसामुळं बेदाणा, डाळिंब, शेवगा आणि केळीचं मोठं नुकसान झालंय. पंढरपूर तालुक्यातल्या ईश्वर वाठार येथील शेतकरी शिवाजी हळणवर यांच्या बेदाणा शेडवरील पत्रे आणि कागद उडाल्याने सहा लाख रुपयांच्या ती टन बेदाण्याचं नुकसान झालं. तर पळशी इथल्या शेतकऱ्याच्या दोन एकरावरच्या शेवग्याचं नुकसान झालं

Sangli Rain : सांगलीत वीज पडून तब्बल 24 मेंढ्याचा मृत्यू
Sangli Rain :  सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे वीज पडून तब्बल 24 मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. यात पतंगराव देसाई या शेतकऱ्याचे साडेचार लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तहसीलदार यांनी तातडीने भेट दिली आहे आणि पंचनामा केला आहे. सांगली जिल्ह्यात काल सायंकाळतपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.. तर ढालगाव येथे वीज पडून तब्बल 24 मेंढ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात तर शेतकऱ्याचे साडेचार लाख रूपयाचे नुकसान झाले आहे..
Parbhani Rain :  परभणी शहरासह काही तालुक्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

Parbhani Rain :  मागच्या अनेक दिवसांपासून प्रचंड गरमी अनुभवल्या नंतर आज परभणी शहरासह काही तालुक्यात सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसलाय.. या पावसाने सर्वत्र वातावरणात गारवा निर्माण झालाय.आज पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने शहरातील रस्ते जलमय झाले होते तसेच ठिकाणी पाणी ही साचले होते याच पावसाचा आढावा घेतलाय

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान गुड्डापुर पाण्यात

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुड्डापुर परिसरात काल सायंकाळ पासून सुरु झालेल्या मान्सून पूर्व पावसाने मंदिर आवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे.  या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गुडघाभर पाणी साचले आहे. येथे  दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी पाण्यात पोहण्याचा आनंद घेत देवीचे दर्शन घेतले.  तीर्थक्षेत्र गुड्डापुर जलमय होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पार्श्वभूमी

Pre Monsoon Rain : महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं  (Pre Monsoon Rain) जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, देशाचा विचार केला तर देशात मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीत घट झाल्याचे दिसत आहे. देशातील 12 राज्यात दुष्काळासारखी परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात 1 मार्च ते 17 मे पर्यंत सरासरीच्या 73 टक्के मान्सूनपूर्व पाऊस कमी झाल्याची नोंद झाली आहे. 


मान्सूनपूर्व पाऊस पुरेसा झाला तर खरीप पिकांना मोठा आधार मिळत असतो. शेतीची कामं सुरु करण्यास बळीराजा सुरुवात करत असतो. मात्र, सरासरीपेक्षा मान्सूनपूर्व पाऊस कमी झाला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे भाजीपाला आणि इतर पिकांना देखील दिलासा मिळत असतो. मात्र पाऊस कमी झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. विशिष्ट मोसमात भारताच्या नैर्ऋत्य दिशेकडून येऊन भारताला धडकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणतात. 


उष्णतेपासून दिलासा


राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आह. तर दुसरीके वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बळीराजाला मात्र फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. पाहुयात कुठे कुठे झाला पाऊस.


मान्सूनसाठी अनुकूल वातावरण
 
दोनच दिवसांपूर्वी अंदमानात पोहोचलेल्या मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार आहे. यावर्षी नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे  देशातील पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होतोय. तसेच महाराष्ट्रातही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. 


12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होणार


हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार दिवस हे पावसाचे असणार आहेत. यात कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून सुरु होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.