औरंगाबाद : आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्ष कामाला लागले असून, राज्यभरात महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांचा धुराळा पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज मराठवाड्यात देखील 'सभांची जत्रा' पाहायला मिळणार आहे. कारण एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आज सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांची सभा होत आहे. परभणी जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहे. तर बीड जिल्ह्यात अजित पवारांची सभा होणार असून, या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे अनेक मंत्री सहभागी होणार आहेत. तर, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत सभा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे संध्याकाळी औरंगाबादच्या वैजापूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे. 


परभणीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम... 


परभणीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी 11.30 वाजता परभणीत दाखल होणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळपास 20 ते 25 हजात लोकांची आसन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 


अजित पवारांची बीड जिल्ह्यात सभा... 


उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड शहरात पहिल्यांदाच येत असून, बीड शहरांमध्ये अजित पवार यांच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील 24 तासांपासून या ठिकाणी मंडप उभारणी आकर्षक सजावट करणे अशी कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या सभेसाठी साडेसात ते आठ हजार कार्यकर्ते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सभेच्या निमित्ताने अजित पवार बीडवासियांसाठी काय घोषणा करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच बीडमध्ये शरद पवारांनी सभा घेतली होती. त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची आज सभा होत असल्याचे बोलले जात आहे. 


हिंगोलीत उद्धव ठाकरेंची सभा... 


एकीकडे मराठवाड्यात आज सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सभा होत असतानाच, दुसरीकडे उद्धव ठाकरेंची देखील हिंगोलीत सभा होत आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा हा जिल्हा असून, उद्धव ठाकरे या ठिकाणी काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेते झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून आज उद्धव ठाकरे हिंगोलीत सभा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर या सभेची गेल्या आठवड्याभरापासून ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ajit Pawar : मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, पदाचा वापर बारामतीकरांसाठी करणार; अजित पवारांचे बारामतीत जोरदार शक्तिप्रदर्शन