रायगड : गेल्या 12 - 13 वर्षांपासून रखडलेला असून तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्च करून अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झाली. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला पनवेलमधील पळस्पे फाट्यापासून सुरुवात झाली. या यात्रेत अनेक पदाधिकारी सहभागी झाली असून  कोकणची लेक अर्थात कोकणकन्या  अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Walawalkar) कोकणकरांच म्हणणं  मांडण्यासाठी पुढे आली आहे. तळ्यात मळ्यात आणि संगीत खुर्चीचा खेळ आटोपला असेल तर आमच्या महामार्गाच्या प्रश्नावर लक्ष पडू दे  असे गाऱ्हाणे गात तिने मिश्किल अंदाजात टिप्पणी केली आहे. 


काय म्हणाली कोकणकन्या?


तळ्यात मळ्यात आणि संगीत खुर्चीचा खेळ आटोपला असेल तर आमच्या महामार्गाच्या प्रश्नावर लक्ष पडू दे रे महाराजा.... 


तात्पुरत्या खुर्चीचा खेळ आख्खो महराष्ट्र बघता पण तात्पुरती मलमपट्टी करुची बंद करा रे महाराजा... 


मुंबई गोवा महामार्गाचे जे काही  प्रश्न असत जे काय अडचणी असतील ते दूर  कर... चांद्रयान चंद्रावर खड्डे आणि पाण्याचा तपास करीलच पण आमच्या महामार्गावरील खड्डे आणि पाण्याच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष पडून दे रे महाराजा...


मुंबईत धावणारे चाकरमानी आणि कोकणात येणारे पर्यटक जीव धोक्यात घालून महामार्गावर प्रवास करत आहे... कित्येक जणांचे जीव गेले आहेत त्यामुळे ही थुकपट्टी बंद करुन एकदा चतुर्थीच्या आधी चाांगला महामार्ग दाखव रे महाराजा ..... 


कोकणकन्या तिच्या वेगवेगळ्या व्हिडिओजमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मुंबई गोवा महामर्गावर  कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अंकिता वालावलकरने मिश्किल अंदाजात टिप्पणी केली आहे. या अगोदर देखील तिने कोकणाशी संबंधित वेगवेगळ्या प्रश्नांवर व्हिडिओच्या माध्यमातून कोकणकरांच म्हणणं मांडले आहे. 


कोकण कन्या अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा आहे. ती तिचे व्हिडिओ मालवणी भाषेत बनवते. तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अंकिता कोकणातील फूड आणि टुरिझमवर कोकणी भाषेतच व्हिडीओ बनवते. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्राम, युट्यूबवर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.


कोलाडमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदयात्रेचा समारोप


गेल्या 12-13  वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झाली. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला पनवेलमधील पळस्पे फाट्यापासून सुरुवात झाली आहे. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली जागर यात्रेला रायगड आणि रत्नागिरीतून पाठबळ मिळतंय. मनसेचे नेते दोन्ही जिल्ह्यांतून 84 किलोमीटरची पदयात्रा करून कोलाडमध्ये येतील. कोलाडमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदयात्रेचा समारोप होणार आहे.