पुणे: मी सत्तेसाठी हापापलेला नेता नाही, सत्ता काय येते आणि जाते, पण मिळालेल्या पदाचा वापर हा इथल्या लोकांच्या विकासासाठी करणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. बारामतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत होईल असं वाटलं नव्हतं, आज मी जो काही आहे तो बारामतीकरांमुळेच असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती आल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच बारामतीला भेट दिली. त्यावेळी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. 


बारामतीकरांनी गेल्या निवडणुकीत मला 1 लाख 68 हजारांच्या मताधिक्यांने निवडून दिलं, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली असून त्यासाठी मी सकाळी पाच वाजल्यापासून काम करतोय, इथल्या लोकांना भविष्यात काही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय असं अजित पवारांनी सांगितलं. 


कामामध्ये रमणारा मी कार्यकर्ता असल्याचं सांगत बारामतीकर एवढ्या उत्साहात स्वागत करतील असं वाटत नव्हतं असं अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, आज जो काही आहे तो बारामतीकरांमुळेच आहे. फुले, शाहू महाराज आणि आंबेडकरांचा विचार मी कृतीतून पुढे नेणारा कार्यकर्ता आहे. उद्याची 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन मी कार्य करतो. त्यावेळी कधी अतिक्रमण करावं लागतं आणि काही कठोर निर्णय घ्यावी लागतात. पण ती गरजेची असतात. मी कधीच कुणाला उघड्यावर सोडलं नाही. 


अजित पवार म्हणाले की, मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, सत्ता काय मिळत असते आणि जातही असते. मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्यांसाठी करणे आवश्यक आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागतील. सुदैवाने राज्याची तिजोरी आपल्या ताब्यात आहे, त्यामुळे या भागातील जनतेची कामं जोमाने करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. पुणे-नगर- नाशिक ही रेल्वे रेंगाळली आहे, येत्या काळात त्यासाठी पाठपुरावा करणार, वेळ पडल्यास दिल्लीत जाऊन वरिष्ठांची भेट घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक 


मोदींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नेल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ते म्हणाले की, मागे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोललो, त्यावेळी मला माहिती नव्हतं की नंतरच्या काळात एवढ्या चांगल्या प्रमाणात कामं होतील. पण मोदींच्या नेतृत्वामध्ये देश आता प्रगती करत आहे. चांद्रयानामुळे देशाचा जगात गौरव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला नवी दिशा दिली. त्यामुळे भारताला जगभरात प्रतिष्ठा प्राप्त झाली. 


ही बातमी वाचा: