Maharashtra Politics Ajit Pawar Supriya Sule: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विधानसभेच्या 90 तर लोकसभेच्या 13 जागा अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar) लढवल्या जातील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) विरुद्ध अजित पवार कोणाला उमेदवारी देणार असा प्रश्न विचारला जात आहे. बारामतीसह (Baramati Lok Sabha) इतरही ठिकाणचे पक्षाचे बहुतांश पदाधिकारी अजित पवारांच्या गटात सहभागी झाल्यानं बारामती लोकसभेची आगामी निवडणूक रंगतदार होऊ शकते . 


देशाच्या राजकारणात कितीही बदल झाले, कितीही उलथापालथी झाल्या, राजकारणाच्या प्रवाहांनी कशीही वळणं घेतली तरी बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण सहा दशकं कायम राहिलं आहे. मात्र, या वेळची उलथापालथ बाहेरून नाही तर पवारांच्या घरातून सुरु झाली आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी बारामतीत उभी फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेची जागा अजित पवारांकडून कोण लढवणार असा प्रश्न उभा राहिलाय. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना झाल्यास अजित पवारांकडे सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध पुढील पर्याय असू शकतात . 


या उमेदवारांच्या नावाची चर्चा:
 


रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्यभर असलेली ओळख लक्षात घेऊन त्यांचा विचार अजित पवारांकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी होऊ शकतो. मात्र, रुपाली चाकणकर यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव नसल्यानं अजित पवार त्यांचे मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील उमेदवारांचा विचारही सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध करू शकतात. 


राहुल कुल (Rahul Kul) - दौंडचे आमदार असलेले राहुल कुल भाजप नेतृत्वाच्या जवळचे आहेत. 2019 ला राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती.
 
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) - अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांना असलेला अनुभव पाहता त्यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजप करू शकतं. 


विजय शिवतारे (Vijay Shivtare) - विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि त्यांनी अनेकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  


राहुल कुल आणि विजय शिवतारे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तर हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे पुढारी आहेत. तिघांनीही अजित पवारांशी जमत नाही या एका कारणास्तव आपला मूळ पक्ष सोडला किंवा अजित पवारांनी त्यांना तसं करण्यास भाग पाडलं. मात्र आता सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध सक्षम उमेदवार द्यायचा झाल्यास यातूनच निवड करावी लागणार आहे . 


बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दौंड आणि खडकवासला या दोन मतदारसंघात राहुल कुल आणि भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत. तर, पुरंदर आणि भोर या दोन मतदारसंघात संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत. 


2014 साली सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे जवळपास सत्तर हजारांच्या मताधिक्यांनी निवडून आल्या होत्या. तर 2019 ला राहुल कुल यांना पत्नी कांचन कुल यांना जवळपास सव्वा लाखाने पराभूत करून सुप्रिया सुळे विजयी झाल्या . 


1991 ला शरद पवारांनी अजित पवारांना थेट लोकसभेची उमेदवारी देत राजकारणात आणलं. त्यानंतर शरद पवारांनी बारामतीचा पक्षाचा कारभार देखील संपूर्णपणे अजित पवारांकडे सोपवला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक असेल किंवा निवडणुकांमधील तिकीट वाटप असो...अजित पवार यांचा शब्द अंतिम ठरला. त्यामुळं जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा अजित पवारांकडून उपकृत झालेले हे बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी अजित पवारांच्या मागे उभे राहिले. 


बारामतीचा गड जिंकायचाच अशी गर्जना भाजपने अनेकदा करूनही त्यात त्यांना अद्याप यश आलेलं नाही . मात्र आता बारामतीवर पकड असलेले अजित पवारच आपल्या बाजूला आल्यानं भाजप ही ऐतिहासिक संधी साधण्याचा प्रयत्न करू शकतं. 


आगामी निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांच्या विरुद्ध लढताना पाहायला मिळतील. मात्र, बारामतीत उमेदवार कोणीही असला तरी या लढतीच स्वरूप  पवार  विरुद्ध पवार अशा  भाऊबंदकीच असेल. या लढतीला भावनिक किनार असेल आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात विभागले गेलेल्या कार्यकर्त्यांची ती सत्वपरीक्षा ठरणार आहे. अर्थात पवार कुटुंब ही वेळ येऊ देईल का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


इतर महत्त्वाची बातमी: