Shivsena: मागील तीन दशकांहून शिवसेनेची निवडणुकीत ओळख असलेल्या धनुष्य बाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) या निवडणूक चिन्हावरील दाव्याची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दुपारी दोन वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. दुपारी दोन वाजण्याच्या काही मिनिटे आधीच शिवसेनेने वकिलांमार्फत निवडणूक आयोगाकडे आपले उत्तर सादर केले आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या (Andheri Bypoll Election) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी, शिवसेनेच्या ठाकरे गटाने 800 पानांचे उत्तर निवडणूक आयोगाला सादर केले होते. हे 800 पानी उत्तर पक्षातील फुटीबाबतची माहिती देणारे होते. त्यानंतर आज शिवसेनेने वकिलांमार्फत निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाबाबत दावा सादर केला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर शिवसेनेच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याशिवाय अडीच लाखांहून अधिक प्रतिज्ञापत्र दिले असून आता लवकरच 10 ते 12 लाख पक्ष सदस्य नोंदणी आयोगासमोर सादर करणार आहोत. निवडणूक आयोगाला उत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आणि निवडणूक चिन्हासाठी देण्यात येणारा ए,बी फॉर्म देण्याचा अधिकारी सध्या तरी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे असल्याचे दावा प्रतित्रापत्रात केला आहे. निवडणूक आयोग येत्या काही दिवसातच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाचे निर्देश देण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत निवडणूक आयोगाचे कामकाज
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे आणि इतर बाबीनंतर निवडणूक आयोगाचे कामकाज मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. त्यानंतर निवडणूक आयोनाने दोन्ही गटांना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आपले उत्तर सादर करण्याचे निर्देश दिल होते. या निर्देशानुसार, आज दुपारी 12 वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभेतील बहुतांशी सदस्य आहेत. पक्षाच्या घटनेनुसार, पक्षाची कार्यकारणी, प्रतिनिधी सभा मोठी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. शिवसेनेचे संघटनात्मक बळ उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे चित्र सध्या आहे.
तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार, 12 खासदार असे संसदीय पक्षाचे बहुमत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. विधीमंडळ पक्षाचे बहुमत आमच्याकडे असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.