Loss in Flower Crops : सध्या देशात परतीच्या पावसासाठी (Rain) पोषक वातावरण तयार झालं आहे. काही ठिकाणी तर मान्सूनचा (Monsoon) परतीचा प्रवास सुरु झाला आहे. दरम्यान, यावर्षी देशाच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. तर काही राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. फुल शेतीवर देखील या अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) आणि पश्चिम बंगालच्या (West Bengal)फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं सध्या बाजारात फुलांची आवक कमी होत आहे. त्यामुळं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळं अनेक राज्यांमध्ये पिकांचं तसेच बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीचा फुल शेतीवर परिणाम झालं आहे. फुलांच्या उत्पादनात घट आली आहे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फुल शेती केली जाते. परंतू यंदा पावसामुळे फुलांचे पीक जवळपास नष्ट झाले आहे. त्यामुळं मंडईत फुलांची आवकही बरीच कमी झाली आहे. तर दुसरीकडे कपश्चिम बंगालमध्येही फुलांच्या पिकांचं नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र हे फुल शेतीचं केंद्र
महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी आता पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. त्याच धर्तीवर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा, अकोळनेर, वासुंदे, खडकवाडी परिसरात पावसाच्या सरी पडल्याने फुलांच्या पिकांवर काळे डाग पडले आहेत. काही शेतात फुले आतून कुजली आहेत. या समस्या पाहता आता शेतकरी संकटात सापडला आहे. फुल शेती पिकांवर वाईट परिणाम झाल्यानं बाजारात फुलांची आवकही 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळं फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. आता बाजारात पांढऱ्या शेवंतीला प्रति किलोला 200 रुपयांचा दर मिळत आहे. तसेच झेंडूला किलोला 60 ते 80 रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, पावसाचा फटका फुल शेतीला बसल्यामुळं शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलं नाहीयेत. परिणामी बाजारात आवक कमी आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
दरम्यान, यावेळी सणासुदीच्या काळात फुलांची पिकं वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत. एप्रिलमध्ये लागवड केलेले पीक ऑक्टोबरपर्यंत खराब झाले आहे. या महिन्यात फुलांच्या काढणीला सुरुवात होत असते. कारण या दोन महिन्यात मोठे सण असतात. याचा फायदा फुल उत्पादक शेतकऱ्यांना होत असतो. मात्र, आता फुल उत्पादकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: