Maharashtra Politics: महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) नगरविकासमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांनी (Shiv Sena Rebel MLA) बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागलीय. शिवसेनेचे आता 12 खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची? असा प्रश्न उपस्थित झालाय. एकिकडं शिंदे गट आणि दुसरेकडं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमची शिवसेना खरी असल्याचा दावा करत आहेत. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत (Central Election Commission) गेलंय. त्यामुळं केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना आपली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. जे लोक आज घोड्यावर बसलेले दिसत आहेत, महाराष्ट्रातील लोक उद्या त्यांचीच गाढवावरून धिंड काढतील, असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय. 


संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, "कोणती शिवसेना खरी आहेस त्याचा पुरावा महाराष्ट्रातील 11 कोटी जनता आहे. शिवसेनेसाठी बलिदान दिलेले 69 हुतात्मे, हाजारो अदोलनांतून आमचे शिवसैनिक, मराठी बांधव शहीद झाले, तरूंगात गेले. तसेच 1992 दंगलीत आमच्यासह हजारो लोकांविरुद्ध खटले दाखल झाले. महाराष्ट्राच्या मातीत, मराठी माणसांच्या रक्तात आणि मनगटात शिवसेना आहे, हाच पुरावा आहे. पैसे देऊन किंवा दहशतीनं 10-20 फोडले म्हणजे हा पुरावा होत नाही. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं शिवसेना पुढे चालली आहे. निवडणूक आयोग आणि अन्य यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात? हे सर्वांना माहिती आहे. ज्यांनी शिवसेनेवर आज ही वेळ आणली, त्यांना बाळासाहेबांचा आत्मा कधीच माफ करणार नाही. या मातीतच तुम्हाला संपायचं आहे. आज तुम्ही घोड्यावर बसलेला आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत", असाही इशारा संजय राऊंतांनी दिलाय. 


शिवसेना कोणाची? 8 ऑगस्टला निर्णय होणार
शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की, उद्धव ठाकरे यांची? याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दोन्ही बाजूंचे दावे ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. 


शिंदे गटाचं शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर लक्ष्य
एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत बहुमताची पहिली लढाई जिंकली आहे. विधीमंडळात शिवसेना म्हणून अधिकृत मान्यता त्यांच्याच गटाला असल्याचं विधानसभा अध्यक्षांनीही जाहीर केलंय. ही एक लढाई जिंकल्यानंतर आता शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आहे. 


हे देखील वाचा-