Nashik Earthquake : सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) खोकरविहीर येथे काही दिवसांपूर्वी हादरे, भूगर्भांतून आवाज येण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता पेठ, (Peth) त्र्यंबक (Trimbakeshwer) तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 


नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सुरगाणा पेठ तालुक्यात पावसामुळे अनेक भागात जमीन खचली, रस्त्यांना डोंगरांना भेगा गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पेठ तालुक्यातील  खरपडी, नाचलोंढि, धानपाडा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैराईपाली  या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जमिनीला हादरे बसल्याचे, तसेच भिंती, दरवाजे, खिडक्यांची तावदाने हलल्याचे सांगितले जात आहे.


सुरुवातीला साधारणत: एक ते दीड कालावधीत जमीन हादरली. दरम्यान हे धक्के दि. 21 जुलै व 22 जुलै या दिवशी बसले आहेत. यामध्ये पेठ तालुक्यातील खरपडी, नाचलोंढि, धानपाडा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैराईपाली या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दि. 21 जुलै रोजी 11 वाजून 02 मिनिटांनी 64 सेकंदासाठी जमीन हादरली. त्याची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल इतकी होती. तर दि. 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास 3 रिश्टर स्केल चा भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद नाशिक मेरी येथील भूकंप मापक यंत्रावर करण्यात आलेली आहे. 


2017 मध्ये देखील अशाच पद्धतीने पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. तर त्याचवेळी कळवण तालुक्यातील दळवटसह काही गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे आता पुन्हा पेठ सह त्र्यंबक तालुक्यात धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 


अफवांवर विश्वास नको
नाशिकच्या मेरी या संस्थेत भूकंप मापक यंत्रावर भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेननंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. भुकंपाचे धक्के जाणवले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. या धक्क्यांची तीव्रता अतिशय कमी होती. त्यामुळे जीवीत वा वित्तहानी झालेली नाही. वारंवार असे धक्के जाणवल्यास नागरिकांनी मोकळ्या जागी स्थलांतरीत होऊन तात्काळ तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवकांना संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.