Raju Shetti : दूध दराच्या मुद्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच शेतकरी संघटना आक्रमक होतोना दिसत आहेत. सध्याचा दुधाचा उत्पादन खर्च लक्षात घेता, दुधाला मिळत असलेला दर कमी आहे. त्यामुळं दुधाला उसाप्रमाणं हमीभावाचं धोरण लागू कराव अशी मागणी वेळोवेळी शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व  दुग्ध विकास राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांची दिल्लीत भेट घेतली. जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावं अशी मागणी राजू शेट्टींनी केंद्रीय मंत्री संजीव बलियान यांच्याकडे केली आहे.


दुधाचा वाढलेला उत्पादन खर्च विचारात घेता सध्या दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावं, अशी मागणी शेट्टींनी केली आहे. नवी दिल्लीत राजू शेट्टी यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व  दुग्ध विकास राज्यमंत्री संजीव बलियान यांची भेट घेतली. यावेळी दुधाच्या दरासंदर्भातील विषयावर त्यांच्याशी शेट्टींनी चर्चा केली. यावेळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक उत्तर प्रदेशचे माजी आमदार व्ही. एम. सिंग देखील उपस्थित होते.


खासगी उत्पादकांचा हिस्सा मोठा


महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुमारे दोन कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत असले तरी त्यातील 60 टक्के हिस्सा हा खासगी उत्पादकांचा तर 40 टक्के हिस्सा हा सहकारी संस्थांचा आहे. दूध दराचं नेमके धोरण अस्तित्वात नसल्यानं दूध उत्पादकांना कमी दर मिळण्याची समस्या सतावत आहे. दुधाला दर देण्याबाबत सहकारी संस्थांवर बंधन असल्यानं त्याचे पालन होते. खासगी दूध संघावर नियंत्रण नसल्याचे अधिकारी सांगतात. सर्वाधिक दूध संकलन खासगी दूध संघाकडून होत असल्यानं आणि त्यांच्याकडूनच दूध उत्पादकांची लूट होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून वारंवार केला जात आहे.


दरम्यान, दूध दराच्या मुद्यासंदर्भात विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी तत्कालीन दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्याशी देखील चर्चा केली होती. त्यांच्यासोबत दुधाच्या हमीभावासंदर्भात बैठका देखील झाल्या होत्या. याबाबत सर्व गोष्टींची पूर्तता करुन लवकरच निर्णय घेऊ अशा प्रकारचे आश्वासन केदार यांनी दिले होते. मात्र, त्यांनीही याबबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून पायउतार झालं आहे. आता नवीन सरकार राज्यात स्थापन झालं आहे. त्यामुळं हे नव सरकार आता दुधाच्या दराबाबत काही ठोस निर्णय घेणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: