Sharad Pawar :  देशाच्या राजकारणात निवडणुकीत कधीही पराभव स्वीकारावा न लागणारे शरद पवार यांना राजकारणातील अजेयी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांनी 56 वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत आपला पहिला विजय साकारला होता. अवघ्या 26 वर्षांच्या शरद पवार या तरुणाने या विजयाने आपल्या विधिमंडळ, संसदीय राजकारणाची सुरुवात केली. शरद पवार यांनी 22 फेब्रुवारी 1967 रोजी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 


शरद पवार यांना राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यांच्या आई शारदाबाई पवार या राजकारणात सक्रिय होत्या. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. कॉलेजमध्ये असताना  विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांनी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी केलेल्या भाषणावर यशवंतराव चव्हाण प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी पवार यांना काँग्रेसमध्ये काम करण्याची सूचना केली. यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना युवक काँग्रेसची जबाबदारी दिली. अवघ्या 24 व्या वर्षी शरद पवार हे युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष झाले. 


उमेदवारीचा प्रस्ताव  फेटाळला


शरद पवार हे बारामती मतदारसंघातून 1967 साली विजयी झाले होते. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी नाराज होते. 26 वर्षांच्या शरद पवार यांना तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी बारामतीमधून निवडणूक लढणार का, असा प्रश्न केला. शरद पवार यांच्या उमेदवारीला बारामतीमधूनच विरोध करण्यात आला होता. बारामती तालुका काँग्रेसने एक विरुद्ध 11 या मतांनी पवार यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळला. पुणे जिल्हा काँग्रेसने हा प्रस्ताव राज्य कार्यकारणीकडे पाठवला. 


बारामती निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार


तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढे उमेदवारांची नावे आणि स्थानिक संघटनांचे ठराव चर्चेला आले. त्यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसने बारामती तालुका काँग्रेसचा प्रस्ताव पुढे करून शरद हा नवखा आहे. उमेदवारी दिल्यास बारामतीमधून पराभव होण्याची शक्यता असल्याचे यशवंतराव चव्हाण यांना सांगितले. मात्र, शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी विनायकराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण आग्रही होते. 


अशी मिळाली संधी


शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात या निवडणुकीबाबतची माहिती आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या एकाला यशवंतराव चव्हाणांनी विचारले, 270 पैकी किती जागी काँग्रेस विजयी होईल? त्यावर नेत्याने सांगितले की, 190 ते 200 जागांवर विजयी होऊ. त्यावर चव्हाणांनी प्रतिप्रश्न करत 80 उमेदवार पराभूत होतील, असा अर्थ आहे का?' त्यावर त्या नेत्याने होय असे उत्तर दिले. त्याचा आधार घेऊन यशवंतराव म्हणाले, 'ठीक आहे, मग बारामतीची आणखी एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या.' अशी सूचना केली. 


यशवंतराव चव्हाण यांनी  शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची अशी उमेदवारी दिली. मात्र, स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध कायम राहिला होता.


निवडणुकीचा प्रचार आणि विजय


उमेदवारी मिळाल्यानंतर शरद पवार यांनी बारामती गाठून प्रचारास सुरुवात केली. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरू होता. काहींनी सामूहिक राजीनामेदेखील दिले होते. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर युवक आले होते. त्यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली. याच युवा वर्गाने 26 वर्षाच्या उमेदवाराला विरोधी पक्षाच्या उमेदवारापेक्षा दुप्पट मताधिक्याने विजयी केले.