Ajit Pawar:  आमचा पक्ष जर साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असेल तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आमची चिंता करू नये, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकमधील प्रचार सभेत बोलताना फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याची खोचक टीका केली होती. या टीकेलाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 


राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही साडे तीन जिल्ह्यातले आहोत. तर, त्यांनी आमच्या नेत्यांबाबत चिंता करता कामा नये. भाजपचे नेते राष्ट्रवादी नेहमी आमच्या बद्दल बोलत असतात. शिवसेना फोडली...आणि काँग्रेसबद्दलही तसाच प्रचार भाजपकडून करण्यात येतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 


शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र 'दैनिक सामना'तील अग्रलेखावरही अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात वेगवेगळी वृत्तपत्रे असून त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. त्या भूमिका मांडण्याचं काम संपादक करतात. त्या वृत्तपत्रातील मत हे राज्यातील लोकांचे मत नाही असेही पवार यांनी सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 


निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकामध्ये गेले आहेत. त्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अवकाळी पाऊसामुळे राज्यावर संकट असताना मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये गेल आहे,  शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यता आहे, असे त्यांनी म्हटले. यंत्रणेला कामाला लावले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. 


समाजात तेढ निर्माण करण्याचे काम कोणत्याही संघटनेने करू नये. संविधानविरोधी कारवाई करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असेही अजित पवार यांनी बजरंग दलाच्या बंदीच्या आश्वासनाबाबत म्हटले. कर्नाटकमधील निवडणूक आता भावनिक झाली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. फडणवीस यांनी म्हटले की,  इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणीस यांनी हल्लाबोल केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: