Book Review: माणसाचं मन अत्यंत संकुचित असू शकतं किंवा ते अतिशय विशाल होऊन जगाला कवेत घेऊ शकतं.  'सागर रेड्डी - नाम तो सुना होगा' हे पुस्तक नुकतेच वाचले. हे पुस्तक वाचणारी कोणीही व्यक्ती स्वार्थाच्या चिखलात पूर्वीसारखी लोळत राहू शकत नाही. लेखिका सुनीता तांबे यांनी सागरची ही कथा अत्यंत नितळपणे सांगितली आहे. वाचकाचे मन सागराइतके अथांग करण्याची किमया हे पुस्तक करते. (Book Review OF Nam To Suna Hoga)


भारतातील अनाथाश्रम मुला-मुलींना वयाच्या अठरा वर्षांपर्यंत सांभाळतात आणि त्यानंतर या अनाथ मुलांना चक्क वार्‍यावर हाकलून देतात. ही कोणती व्यवस्था आपण निर्माण केली आहे? सागर रेड्डी या तरुणालाही असेच अठराव्या वर्षी हाकलून देण्यात आले. त्यानंतर त्याचे काय झाले? देशभरात सागरने काय काम उभे केले? याची जबरदस्त प्रेरक हकीकत या पुस्तकात आहे. हे पुस्तक प्रत्येक जिवंत आईबापाने आपल्या मुलांना द्यावे. मुलांना मराठी वाचता येत नसेल तर स्वतः वाचून दाखवावे.


आपल्या आजूबाजूला असंख्य लोक कुत्र्यापेक्षाही वाईट जगत असताना फक्त आपल्याच ताटात सगळे तूपलोणीसाखर ओढण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे लोक शेवटी दुःखातच पडतात. पण हे आपल्याला मरेपर्यंत लक्षात येत नाही.  सागरने स्वतःचा बुक केलेला फ्लॅट विकून निराधार युवकांसाठी दोन फ्लॅट भाड्याने घेतले त्याच क्षणी त्याला आनंदाचा झरा गवसला. आपल्या कुवतीनुसार इतरांचे दुःख दूर करणे हाच खरा सुखाचा मार्ग आहे. पण हे अपवादाने, अपघाताने एखाद्या सागरला कळते. तसे संस्कार सर्वांवर लहानपणापासूनच का होऊ नयेत? येथे आपण कमी पडलो आहोत.


आजही असंख्य नीच लोक घरातल्या घरात एकमेकांना अतोनात छळतात. निराधार लहान मुले आणि स्त्रियांना मरणाचे राबवून घेतात. अतिशय क्रूर अत्याचार करतात. ही प्रगती कशी म्हणावी? माणसाच्या मनाचा कोतेपणा घालवून संवेदना जागवणारे हे पुस्तक सुनिता तांबे यांनी मोठ्या कष्टाने लिहिले आहे. जगातील सर्व भाषांमध्ये या पुस्तकाची भाषांतरे व्हावीत. 


हे पुस्तक वाचून जगभरातील तरुण रक्ताचे लोक स्वार्थापलीकडे जाऊन निराधारांचे आधार होतील आणि माणसांचा छळ थांबवतील हीच आशा आहे. 
म्हातार्‍या रक्ताचे छळवादी अधम जगातून वेगाने कमी होत जावोत हीच सदिच्छा.



  • पुस्तकाचे नाव- 'सागर रेड्डी - नाम तो सुना होगा'

  • लेखिका- सुनिता तांबे

  • अक्षयभारती प्रकाशन, मुंबई



(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही) 



  पाहा माझा कट्टा,  अनाथांचा आधारवड सागर रेड्डीसोबत मनमोकळ्या गप्पा