Maharashtra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी गोंदियाच्या (Gondiya) भरसभेत काँग्रेस पक्षावर (Congress) पक्षावर जोरदार टीका केलीय. सोबतच गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पक्षाच्या आमदार खासदारांच्या कुंडल्या माझ्याजवळ असल्याचा दावा देखील केला आहे. प्रफुल्ल पटेलांनी केलेल्या या दाव्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी जोरदार  प्रत्युत्तर देत घणाघाती टीका केली आहे.


यावर बोलताना पटोले म्हणाले की, त्यांच्याकडे काय कुंडल्या आहेत हे मला माहीत नाही. परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या सर्व चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे आहे. त्यांनी फक्त सुरुवात करावी, मग कोणत्या कुंडल्या बाहेर काढायच्या ते मी ठरवतो. असे मनात त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 


नंबर एकची पार्टी असताना राज्यसभेवर गेलेच कशाला? 


प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पुन्हा आपली इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. उद्या पक्षाकडून संधी मिळाली तर मी नक्कीच लढेल, असे म्हणत त्यांच्या मनात असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर भाष्य करतांना प्रफुल पटेल म्हणाले होते कि, गोंदिया- भंडारा जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी नंबर एकची पार्टी असल्याने महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्याच्या समाचार घेत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जर गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा नंबर एकची पार्टी आहे, तर मग प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर कशाला निवडून गेले.


त्यांनी मैदानात यायला हवं होतं. खरं पाहिले तर ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत, कारण त्यांना माहित आहे की, गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद उरलेले नाही. म्हणून ते राज्यसभेमध्ये निवडून गेलेत. आता आगामी  निवडणुकीमध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचीच खरी ताकद दिसून येईल, असा विश्वास देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केला. 


पक्षाचा आदेश आला तर मी तो पाळेल 


महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये गोंदिया -भंडारा लोकसभेच्या जागेबाबत अद्याप कुठलीही निश्चित माहिती पुढे आलेली नसली तरी, अनेकांनी या मतदारसंघातून लढण्यास आपली इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपली इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. यावर भाष्य करतांना नाना पटोले म्हणाले की, गोंदिया -भंडारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडेच आहे. उद्या पक्षाने मला आदेश दिला तर त्या आदेशाचे मी पालन करेल आणि गोंदिया भंडार लोकसभेची जागा लढवून विजय मिळवेल. असा विश्वास देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केला. 


इतर महत्वाच्या बातम्या