Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांनी पुन्हा आपली भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी (Bhandara Gondiya loksabha) इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढायला पाहिजे, अशी नागरिकांची इच्छा आहे. पण आम्ही महायुतीमध्ये (Mahayuti) आहोत आणि महायुतीमध्ये असताना चर्चा झाल्याशिवाय आपल्या उमेदवारीबद्दल आपण बोलू शकत नाही, असे म्हणत त्यांच्या मनात असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.


आज महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया शहरालगत असलेल्या नागराधाम येथील स्वयंभू पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी प्रफुल पटेल यांनी शिवलिंगाची पूजा अर्चना केली. देशातील सर्व नागरिकांना महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद लाभो, अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी बोलतांना त्यांनी हे विधान केले आहे. 


पक्षाकडून संधी मिळाली तर मी नक्कीच लढेल


भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कायम भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना होत राहिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये या जागेवर नेमके कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत अद्याप कुठलीही निश्चित माहिती पुढे आलेली नसली तरी, अनेकांनी या मतदारसंघातून लढण्यास आपली इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. 'उद्या पक्षाकडून संधी मिळाली तर मी नक्कीच लढेल, असेही प्रफुल्ल पटेल या वेळी म्हणायला विसरले नाही. त्यामुळे राज्यसभेवर गेल्यानंतर देखील प्रफुल पटेल यांना भंडारा-गोंदिया लोकसभेच्या मोह सुटला नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


नाना पटोले निवडणूक लढवण्याची शक्यता?


दुसरीकडे महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही तयारी दर्शविली आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवाराची चाचणी करण्याच्या दृष्टीने लोकसभा लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवून घेतले. त्यात भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातून सुमारे 25 व्यक्तींचे अर्ज काँग्रेसकडे प्राप्त झालेले आहेत. या दोन जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची पाहिजे त्या प्रमाणात सध्या ताकद नाही. त्या तुलनेत काँग्रेसचा मतदार या क्षेत्रात मोठा असल्याने ही जागा काँग्रेसला सुटणार असल्याचे संकेत मिळत आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही वेळेवर निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


आणखी वाचा