Maharashtra Politics Kunbi Community Political Party: राज्यातील कुणबी समाज (Kunbi Community) आता एकवटला असून राजकीय आखाड्यात (Maharashtra Politics) त्याला यश मिळणार का? अशी चर्चा रंगत आहे. याला कारण म्हणजे राज्यातील कुणबी समाजानं आता राजकीय पक्ष (Political Party) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राजकीय पक्षाची नावाची घोषणा केली जाणार आहे. 22 एप्रिल रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी पक्षाचे नाव आणि पक्षाचं चिन्ह याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. त्याबाबतची जोरदार तयारी कुणबी नेत्यांकडून होताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील कुणबी समाजाचा नवीन पक्ष लढवणार आहे. मागील चार ते सहा महिने कुणबी समाजाच्या नेत्यांनी राज्यभर दौरे केले. कुणबी जोडो अभियान राबवले. तसेच रायगड जिल्ह्यात झालेल्या सभेवेळी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आले. त्याचवेळी साधारणपणे आगामी काळात कुणबी समाजाचे नेते मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा रंगली होती. त्यानुसार आता अखेर कुणबी समाज राजकीय पक्षाची स्थापना करणार आहे. 22 एप्रिलला पक्षाचं नाव आणि चिन्ह कळणार आहे. पण, त्याबाबतची उत्सुकता आतापासून लागून राहिली आहे.


राजकीय गणितं किती बदलतील?  


आम्ही मोठ्या संख्येनं आहोत. पण, आमच्या लोकप्रतिनिधींची संख्या मात्र अपेक्षित अशी नाही. राजकीय पक्षांनी आमच्याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. अशी भावना कुणबी समाजाचे नेते आणि सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवतात. त्यामुळे राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये किती यश या पक्षाला मिळतं ते देखील पाहावं लागणार आहे. 


दरम्यान, कोकणातील रिफायनरी विरोध देखील या पक्षाच्या अजेंड्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, मिळालेल्या माहितीनुसार किंवा रायगड येथे झालेल्या मेळाव्यामध्ये रिफायनरीविरोधात एल्गार देण्यात करण्यात आला होता. परिणामी आता राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतर कुणबी समाज रिफायनरीबाबत काय भूमिका घेणार? याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. 


बंजारा समाज राजकारणात


राज्याच्या राजकारणात आता 'बंजारा' समाजाचा नवा स्वतंत्र राजकीय पक्ष उतरणार आहे. या राजकीय पक्षामुळे राज्याची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.  'समनक' जनता पक्ष' असं या नव्या पक्षाचं नाव असणार आहे. या राजकीय पक्षाच्या मागे बंजारा समाजातील काही प्रस्थापित राजकीय नेत्यांनी ताकद पुरवली असल्याची चर्चा आहे.