मुंबई: भाजप-शिवसेनेची 2014 साली युती तुटल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज होते, नॉट रीचेबल होते. पण नंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते परत आले असा गौप्यस्फोट प्रा. प्रदीप ढवळ यांनी केला आहे. 'योद्धा कर्मयोगी, एकनाथ संभाजी शिंदे' हे प्रा. ढवळ यांचे पुस्तक 18 एप्रिलला प्रकाशित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 


भाजपशी हातमिळवणी करा अन्यथा आम्हाला तुरुंगात टाकतील असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडल्याचा दावा बुधवारी आदित्य ठाकरे यांनी केला होता. आता त्यानंतर हा आणखी एक गौप्यस्फोट समोर आला आहे. 


नेमकं काय घडलं? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकीय बंडाचे अजूनही छोटे-मोठे गौप्यस्फोट होत आहेत. अशातच त्यांच्यावर पुस्तक लिहिलेल्या प्रा. प्रदीप ढवळ यांनीदेखील एक गौप्यस्फोट केला आहे. 2014 साली युती तुटली तेव्हाच एकनाथ शिंदे यांना ते आवडले नसल्याने शिंदे नॉट रीचेबाल झाले होते आणि थेट माझ्या गावी आले, तिथेच राहिले. त्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता होती. मात्र त्यावेळी रात्री उद्धव ठाकरे यांचा एक कॉल आला, आणि शिंदे यांनी संयम पाळला, असे ढवळ यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 


प्रा. ढवळ यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत असाही दावा केलाय की, शरद पवार यांनी केवळ तीन दिवसात हे पुस्तक वाचून पूर्ण केले आहे. त्यांनी काही सूचनाही केल्या आहेत आणि प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पवार प्रचंड उत्सुक आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रकाशित होणारे हे पुस्तक आणखीन काय काय गौप्यस्फोट करणार हे बघावे लागेल.


प्रा. ढवळ यांचे 'योद्धा कर्मयोगी, एकनाथ संभाजी शिंदे' हे पुस्तक येत्या 18 तारखेला प्रकाशित होत आहे. या पुस्तकात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापर्यंतचा प्रवास आणि फोटो प्रकाशित करण्यात येणार आहेत. ठाण्यात होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पालकमंत्री शंभूराजे देसाई हे आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. 


आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?


आदित्य ठाकरे यांनी एक दिवसाचा हैदराबाद दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गीतम विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवसेनेतील फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, "शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते. ते रडायला लागले आणि म्हणाले की भाजपसोबत हातमिळवणी करा अन्यथा ते आम्हाला जेलमध्ये टाकतील. मी भाजपसोबत नाही गेलो तर तुरुंगात जाईन, असं ते सांगत होते."