K. Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव (K chandrashekhar rao) यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. आपली क्षमता आजमावून पाहण्याच्या पहिला प्रयत्न केसीआर यांनी महाराष्ट्रापासून सूरू केला आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली आहे. त्याशिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचीही केसीआर यांच्यासोबत भेट झाली आहे. प्रकाश आंबेडकर येत्या 17 तारखेला तेलगंणात केसीआर सोबत एका सोहळ्यात असतील. त्यामुळे केसीआर यांचा महाराष्ट्रातला मराठी चेहरा कोण असेल ? याची चर्चा सुरु झाली आहे. 


तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा महाराष्ट्रातला चेहरा, मित्र कोण ?


स्वाभिमानीचे राजू शेट्टी, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे आणि वंचित बहूजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. केसीआर यांना महाराष्ट्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मराठी नेत्यांशी बोलणी सुरु केली आहे. या तीन नेत्यांशिवाय आणखी काही समविचारी नेत्यांसोबत ते बातचीत करणार असल्याची चर्चा आहे. 


तुम्ही आमच्यासोबत या अशी केसीआर यांनी राजू शेट्टींना विनंती केली आहे. संभाजी राजेंसोबतही केसीआर यांची भेट झाली आहे. प्रकाश आंबेडकर तेलगंणा विधानसभेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. केसीआर यांच्या नांदेड सभेनंतर महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांत बीआरएसची वाहने फिरणार आहेत. या सर्व वाहनांची सुरुवात शिवनेरी गडापासून केली जाणार आहे. देशांतल्या 30 लोकसभा, 70 विधानसभा जागांवर तेलगू भाषिकांचा प्रभाव आहे, असे केसीआर यांना वाटते. हा प्रभाव चाचपण्याची सुरूवात शेजारी असल्याने महाराष्ट्रापासून झाली आहे. म्हणून महाराष्ट्रातला त्यांचा चेहरा कोण हे फार महत्वाचे आहे. 


आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मागणीनंतर केसीआर यांची देशाला ओळख झाली. तेलंगणा स्वतंत्र झाले. गेल्या दोन वर्षांमध्ये रावांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटलेत. तिसऱ्या आघाडीचा प्रमुख बनून थेट पंतप्रधान  किंवा किंगमेकर बनण्याचा प्रयत्नात केसीआर यांचा असेल. त्यामुळेच उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमाकांच्या महाराष्ट्रावर केसीआरची नजर आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांना ते ऑफर देत आहेत.  


केसीआरचे महाराष्ट्रात हे चेहरे झाले तर काय ?


राजू शेट्टी, शेतकरी नेते - 


पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात कांही भागात राजू शेट्टी यांचा प्रभाव आहे. केसीआर यांनी शेतकऱ्यांना अनेक योजना दिल्या आहेत. 2020-21 च्या शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या दिल्ली आणि पंजाबमधील शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून त्यांनी स्वतःला शेतकरी समर्थक नेता म्हणून सादर केले आहे. हे सगळे शेट्टी केसीआर राजकारणाचा बंध ठरू शकतात.


छत्रपती संभाजी राजे -


सर्वसमावेशक भूमिकेसाठी छत्रपती संभाजी राजे ओळखले जातात. शाहू महाराजांचे वंशज त्यामुळे मराठा समाजात चांगले स्थान आहे. केसीआर बहुजन, मुस्लिम समाजाला बरोबर घेवून चालतात. दोघांचे बंध जुळू शकतात. 


प्रकाश आंबेडकर


एमआयएम आणि त्याचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे केसीआर हे मुस्लिम समर्थक नेते मानले जातात. केसीआर मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही मुस्लिम आहेत. उजव्या विचारसरणी विरोधात प्रकाश आंबेडकर यांची आक्रमक भाषा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. केसीआर यांची भाजपासोबत मोठी राजकीय लढाई होणार आहे. हे धागे दोघांना जोडू शकतात. 


महाराष्ट्रामधील प्रमुख वर्तमानपत्रांना मोठमोठाल्या जाहिराती देऊन तेलंगणाच्या विकासाचे चित्र ठसवण्याचा प्रयत्न मोठ्या खुबीनं सूरू आहे. राज्यात भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील सेनेचा गट सत्तेत आहे. त्या विरोधात तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. तिसरीकडे, मनसे आणि अन्य काही पक्ष आहेत. मविआमधली धुसफुस अधून मधून दिसते. काँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी उफाळून आलेली आहे. अशा स्थितीत राव यांना महाराष्ट्रात चांगला चेहरा मिळाला तर बीआरएस हा पक्ष रूजू शकतो. राजू शेट्टींना आर्थिक बळ मिळाले तर ते दोन्ही आघाड्यांना जेरीस आणू शकतात.