Aurangabad Abortion News: मराठवाड्यासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या औरंगाबाद गर्भपात प्रकरणात (Aurangabad Abortion Case) आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणाचे धागेदोरे थेट जालना आणि बीड जिल्ह्यापर्यंत असल्याचे तपासात समोर आले आहेत. औरंगाबादच्या (Aurangabad) चित्तेगाव येथे एका डॉक्टर दाम्पत्याने महिलेचा गर्भपात केल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणी पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान गर्भपातप्रकरणी वापरण्यात आलेला इंजेक्शनचा साठा शहरातील चार होलसेल औषधी व्यापाऱ्यांकडून इतर तीन जिल्ह्यातील मेडिकलवर गेला असल्याचे समोर आले आहे. 


चित्तेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयात अवैध गर्भपातानंतर रक्तस्राव रोखण्यासाठी वापरण्यात आलेले इंजेक्शनचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून याची चौकशी केली जात आहे. दरम्यान वापरण्यात आलेला इंजेक्शनचा साठा शहरातील चार होलसेल औषधी व्यापाऱ्यांकडून तीन जिल्ह्यातील मेडिकलवर गेला होता. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) औरंगाबादसह जालना, बीड जिल्ह्यांतील मेडिकल तपासणी करण्याची तयारी सुरु केली आहे..


या इंजेक्शनच्या बॅच नंबरवरुन पुढील तपास सुरु असून, पुणे इथून हे इंजेक्शन शहरातील चार होलसेल औषधी विक्रेत्यांकडे आणि त्यांच्याकडून औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील अनेक मेडिकलवर विक्री झाल्याचे बिलांवरुन समोर आले. त्यानुसार बिलांवरुन मेडिकलची तपासणी सुरु असून, औरंगाबाद, पैठणनंतर आता इतर जिल्ह्यातील मेडिकलची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्या गर्भपात केंद्रावर कोण औषधी देत होता, हे एक-दोन दिवसांत हे समोर येईल. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) मिलिंद काळेश्वरकर यांनी सांगितले आहे. 


पोलीस पथक आरोपींच्या शोधात 


औरंगाबादच्या चित्तेगाव येथे डॉक्टर दाम्पत्य डॉ. अमोल जाधव आणि डॉ. सोनाली उद्धव काळकुंबे-जाधव हे आपल्या रुग्णालयात गर्भपात करत असल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरणी बिडकीन पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र दोन्ही आरोपी फरार असल्याने पोलिसांकडून त्यांच्या शोध घेतला जात आहे. पोलिसांनी यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली असून, या पथकाकडून तपास करण्यात येत आहे. तर औरंगाबादसह इतर जिल्ह्यात देखील पोलिसांच्या पथकाने जाऊन चौकशी केली असून, डॉक्टर दाम्पत्याचा शोध घेतला जात आहे. तर दोन्ही आरोपी हाती लागल्यास या प्रकरणात अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता असून, यातील साखळी देखील समोर येण्याचा अंदाज लावला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Abortion Case: औरंगाबाद गर्भपात प्रकरणातील धक्कादायक माहिती; मोठं रॅकेट असण्याची शक्यता