Maharashtra Politics: श्रद्धा आणि मनापासून आम्ही सर्वांनी कामाख्या देवीची पूजा केली. सर्वांना समाधान मिळाले असून सर्वजण आनंदात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर दिली. कामाख्या देवीच्या आशिर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नात झालेय. आसाममधील जनतेला आनंद, सुख, समुद्धी मिळाले. तसेच महाराष्ट्राच्या जनतेची सर्व संकटं दूर व्हावीत, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सहकार्य केलेय, त्यांचं आणि स्वागत करणाऱ्या आसामच्या जनतेचे आभार यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार आणि खासदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलेय. तीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटी येथे सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. या काळात त्यांनी भारतातील एक प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे विशेष पूजा केली होती. आमचे प्रयत्न सफल होऊ देत असे साकडे देखील कामाख्या देवीला घालण्यात आले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे कामाख्य देवीच्या दर्शनाला आले आहेत. तिथं त्यांनी नवस फेडला. यावेळी त्यांच्यासोबत समर्थक आमदार आणि खासदारही उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी प्रसारमाध्यमांसी बोलताना एकनाथ शिंदे यांनी अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले.त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शन घेतलं. तिथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर मंत्री, आमदार, खासदार यांनी देखील देवीचे दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर आता सर्वजण पुन्हा एकदा हॉटेल रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना राहण्यासाठी जवळपास संपूर्ण रेडिसन ब्ल्यू हॉटेलच बुक करण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये सत्तांतराच्या काळात देखील मुख्यमंत्री आणि आमदार वास्तव्यास होते. संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट नियोजित आहे. यावेळी इतर महत्त्वाच्या व्यक्तींना देखील मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच, 26 तारखेला रात्री गुवाहाटी येथेच सर्वांचा मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता विशेष विमान पुन्हा एकदा सर्वांना घेऊन उड्डाण करेल आणि एक वाजेपर्यंत मुंबईमध्ये दाखल होईल.