Nagpur : नागपूर शहरालगत असलेल्या म्हसाळा या गावात मेरी पाऊसपिन्स शाळेसमोर स्कूल बसने दिलेल्या धडकेत सम्यक कळंबे या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. शाळा प्रशासनामुळेच हा मृत्यू झाल्याचे आरोप करत आज (26 नोव्हेंबर) शनिवारी शेकडो पालकांनी शाळेवर आक्रोश मोर्चा काढला. तसेच शाळा प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी पालकांनी केली. या घटनेनंतर (22 नोव्हेंबरपासून) शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.


घटनेनंतर देखील वीस ते पंचवीस मिनिट सम्यक जिवंत होता, असा आरोपही प्रत्यक्षदर्शींनी केला. मात्र मेरी पाऊसपिन्स शाळा (Marie Poussepins Academy ICSE School) प्रशासनाने त्याला रुग्णालयात लवकर घेऊन जाण्याची जबाबदारी बजावली नाही, महत्त्वाचा वेळ वाया घालवला. त्यामुळे शाळा प्रशासनच माझ्या मुलाचे मारेकरी आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सम्यकच्या वडिलांनी केली आहे. बस चालक सत्तर वर्ष वयाचा असल्याची माहिती असून एवढ्या वयस्कर माणसाला शाळेची बस चालवायची जबाबदारी कोणी आणि का दिली असा प्रश्नही सम्यक च्या पालकांनी विचारला आहे. बस नादुरुस्त असताना शाळकरी मुलांची ने-आण करत होती. त्यामुळे आरटीओ अधिकारी झोपा काढतात का असा प्रश्नही पालकांनी विचारला आहे. शाळेसमोरचा रस्ता अत्यंत खराब असताना ही शाळा आणि प्रशासनाने ते सुधरवण्यासाठी काहीच का केले नाही असे प्रश्न ही या घटनेनंतर उपस्थित होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस आणि स्कूल व्हॅनला शाळेच्या प्रांगणात येऊ दिले जात नाही. मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच त्यांना उभे ठेवण्यात येते. त्यामुळे शाळा सुटल्याबरोबर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. तसेच आपल्या बसमधील सर्व विद्यार्थी आले की स्कूल बस आणि व्हॅन चालक निघण्याची घाई करत असतात. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून नियोजन करणे अपेक्षित असताना शाळेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही यावेळी पालकांनी केला आहे.


अशी घडली होती घटना...


शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी स्कूल बस, स्कूल व्हॅनने जाणे येणे करतात. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी शाळा सुटली होती.  त्यानंतर शाळा सुटल्यावर सर्व विद्यार्थी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येत होते. तेवढ्यात शाळेची बस बाहेर आली आणि एका महिलेला आणि पुरुषाला धडक दिली. त्यानंतर चालकाला काही कळलेच नाही. त्याने सरळ बस दामटणे सुरु केले आणि पुढे असलेल्या एका खासगी स्कूल व्हॅनला धडक दिली. काही दूरपर्यंत ती व्हॅन (School Van) बसने घासत नेली. दरम्यान रस्त्याच्या बाजूने दोन मुले पायी जात होती. बसने दोघांनाही धडक दिली. त्यांपैकी एक मुलगा बाजूला फेकला गेला आणि दुसरा आठवीतील विद्यार्थी सम्यक दिनेश कदंबे (वय 13 वर्षे)  बसच्या खाली आला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता.  त्याच्या डोक्यावरुन बसचे चाक गेले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले होते. 


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Politics:कामाख्या देवीच्या दर्शनासाठी शिंदे गट गुवाहाटीला; पण 'हे' मंत्री, आमदार-खासदार मात्र राज्यातच