Eknath Shinde: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत (Congress NCP) आघाडी केल्याने शिवसेनेत फूट पडली असल्याचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून दिले जात असताना आता काँग्रेसही त्याविरोधात आक्रमक झाली आहे. आपल्या गद्दारीचे पाप लपवण्यासाठी एकनाथ शिंदे काँग्रेसवर आरोप करत असून आता हे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने दसरा मेळाव्यात पाहिले असल्याचा हल्लाबोल पटोले यांनी केला.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करणे हे शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटांकडून वारंवारपणे सांगण्यात येते. त्यांच्या आरोपांवर काँग्रेसने आता जाहीर भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात काँग्रेस पक्षावर टीका केली. वास्तविक पाहता एकनाथ शिंदे यांची गद्दारी हा त्यांचा व शिवसेना पक्षाचा अंतर्गत विषय आहे. परंतु आपल्या बंडखोरीचे पाप झाकण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक मंत्री, आमदार वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत ते आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण आहे किंवा असावा याची चिंता एकनाथ शिंदे यांनी करु नये. एकनाथ शिंदे यांना स्वतःचा पक्ष कोणता आहे हे नाही त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना, अनुभवी तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा व देशाला जगात ताठ मानेने उभा करण्यात सिंहा वाटा असलेला पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांची कामगिरी काहीही नाही. भाजपाच्या इशाऱ्यावर काम करणे व दिल्लीच्या आदेशाची अंमलबजावणी करणे एवढेचे त्यांचे कर्तृत्व आहे, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली.
मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती. परंतु या जनतेने शिंदेचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेल्या स्क्रिप्टचे वाचन केले असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.
तेव्हा धाडस का केले नाही?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 2019 साली निवडून आणलेल्या आमदारांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवून राज्यातील जनतेच्या हितासाठी हे सरकार स्थापन केले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबरचे ४० आमदारही या सरकारमध्ये होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. काँग्रेसचा पाठिंबा एवढा नकोसा होता तर त्याचवेळी बाहेर पडण्याचे धाडस का केले नाही? असा सवाल पटोले यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगता पण याच बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? त्यावेळीही विरोध करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी केले होते का? स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा व भाजपाच्या सल्ल्यावर मान डोलावणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला दोष देणे थांबवावे, असेही नाना पटोले यांनी म्हटले.