मुंबई: उद्धव ठाकरे मला कटप्पा म्हणाले, पण तो स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. 


उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाज तुम्हाला वाटायला पाहिजी होती, बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली. त्यावेळी या आमदारांनी विरोध केला होता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला. नारायण राणे म्हणाले होते की, बाळासाहेब असते तर हे मुख्यमंत्री झालेच नसते. एकनाथ शिंदे याने जेवढा त्याग केला आहे तो यांना समजलाच नाही. माझा त्याग काय आहे आणि तुमचा त्याग काय आहे? एकनाथ शिंदे घरात पहाटे तीन-चार वाजता जायचा, त्यावेळी बाप झोपला असायचा. त्याची माझी पंधरा पंधरा दिवस भेटच व्हायची नाही."


एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही कोणत्याही शिवसैनिकाला त्रास दिला नाही. आम्हाला कुणावरही अशा प्रकारचा अन्याय करुन प्रवेश करुन घ्यायचा नाही हे मी जाहीरपणे सांगतो. निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगावं, पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण आता इमोशनल ब्लॅकमेल करता येणार नाही, अशा पद्धतीने पक्ष वाढवता येणार नाही. आता राहिलेलेही आमच्यासोबत येतील."


कोथळा काढणार म्हणाले, एक चापट तरी मारलीय का?


एकनाथ शिंदे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी भाषणात माझ्या नातवावर टीका केली. पण त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करायची, काय टीका करायची हे समजत नाही. पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या. आमचे कोथळे काढणार असं ते म्हणाले, आयुष्यात कुणाला एक चापट तरी मारलीय का?"


तुमच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला असा आरोप एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते म्हणाले की, "माझं कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा त्यांनी ज्यावेळी केली त्याचवेळी माझ्या लक्षात आलं. हम दो, हमारे दो अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली. परिवाराच्या पलिकडे जाऊन कुणाचाही विचार केला नाही."


महत्त्वाच्या बातम्या :