Maharashtra Politics Congress : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस हायकंमाड अॅक्शन मोडमध्ये आले आहे. बाळासाहेब थोरात यांची भेट घेण्यासाठी प्रभारी एच. के. पाटील (H.K.Patil) मुंबईत दाखल होणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) उद्भवलेल्या पेच प्रसंगानंतर पाटील प्रथमच मुंबईत दाखल होणार आहेत.
नाशिक पदवीधर विधान परिषदेत सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले होते. निवडणूक निकालानंतर तांबे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप ए बी फॉर्म चुकीचा पाठवला असल्याचा दावा केला. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेतृत्वाकडून योग्य मान दिला जात नसल्याची तक्रार करत आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली होती. वाढदिवसाच्या दिवशी थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.
बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली. पक्षातंर्गत प्रश्न पक्षात सोडवण्याचे आवाहन काही काँग्रेस नेत्यांनी केले. तर, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर काहींनी आक्षेप घेतले. पक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला सामोरे जाणाऱ्या नाना पटोले यांनीदेखील राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीने पुन्हा डोके वर काढले असल्याची चर्चा सुरू झाली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल स्वपक्षातील काँग्रेसचे नेत्यांची काही प्रमाणात नाराज तर आहेत. मात्र महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची ही नाराजी पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी उघडपणे अनेकदा नाराजी व्यक्त केलेली होती. त्याचसोबत शिवसेनेचं मुखपत्र सामना मधूनही वारंवार नाना पटोले आणि कांग्रेस वरती टिका होताना पाहायला मिळते.
थोरात आपल्या राजीनाम्यावर ठाम?
बाळासाहेब थोरात हे आपल्या राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील हे रविवारी मुंबईत येणार आहेत. आपल्या दौऱ्यात एच. के. पाटील काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. त्याआधी काँग्रेस विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. ही बैठक 4.30 वाजण्याच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत 'हाथ से हाथ जोडो' या मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एच. के. पाटील हे काँग्रेस नेत्यांसोबत बैठक करणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: