Pune Bypoll election : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant more) पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. एकीकडे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाजपसाठी या दोन पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात अशी भूमिका घेतलेली असताना, या निवडणुकीत भाजपच्या विरोधात उमेदवार दिलेले नसताना वसंत मोरे यांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव नक्की आहे, असं म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत ही टीका केली आहे.
सध्या पुण्यात सगळीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आजच सगळ्या पक्षाने प्रचाराचा नारळ फोडला आणि सगळे पक्ष प्रचाराची तयारी करत आहेत. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळ्या भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फळाला आला नाही त्यामुळे आता निवडणुकीची तयारी दोन्ही मतदार संघात जोरात सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनीदेखील पत्र लिहून आवाहन केलं होतं. त्यातच आता मनसेच्याच वसंत मोरे यांची ही फेसबूक पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
वसंत मोरे म्हणाले की, मागील अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलल्या जात आहे. निवडणुकीची सरकारला भीती वाटत आहे. त्यामुळे सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे. जो मनात हरतो तो रणात जिंकू शकत नाही, हे सरकार मनात हरलं आहे. त्यांचा मनामधून पराभव झालेला दिसत असल्याचंही ते म्हणाले. एकीकडे भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढत आहे आणि त्यात वसंत मोरेंनी सरकारवर टीका केली आहे. त्यात त्यांनी हे माझं वैयक्तित मत असल्याचंदेखील बोलून दाखवलं आहे.
पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
माझा शिंदे - फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे दोन आमदार नुकतेच मयत झाले. अजून त्यांच्या सरणाची राख निवलीसुद्धा नसेल. तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या-त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा. कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार?, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.