Maharashtra Congress :  कधीकाळी राज्यात सत्तेवर असलेला काँग्रेसचे (Congress) सध्या राज्यात 50 पेक्षा कमी आमदार आहेत. मात्र, मागील काही निवडणुकीनंतर आता काँग्रेसचे अच्छे दिन सुरू झाले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील कसब्यासह चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. त्यात कसबा मतदारसंघामध्ये (Kasaba Bypoll) भाजपचं वर्चस्व होतं. जिथं 28 वर्षांपासून भाजपचीच एकहाती सत्ता होती. तिथं आज काँग्रेसच्या उमेदवाराने विजयाचा गुलाल उधळला. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने हा विजय मिळवला असला तरी आगामी काळात पक्षाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.


राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासूनची ही दुसरी महत्वाची निवडणूक होती. गेल्याच महिन्यात झालेल्या विधान परिषदांच्या निवडणुकांमध्येही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. याउलट भाजपच्या पदरी मोठी निराशाच आली. पाच जागांसाठी झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये फक्त एका जागेवर भाजपला यश मिळवता आले. दुसरीकडे नागपूर आणि अमरावती सारख्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते. नागपूर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार नागो गाणार यांचा काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला. गाणार गेले 12 वर्षं या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. तर, अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपच्या डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला. भाजपचे डॉ. रणजित पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे या पराभवाची मोठी चर्चा झाली. कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपला विजय मिळवता आला. तर, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस बंडखोर सत्यजीत तांबेंच्या विजयाचं श्रेयही भाजपला आपलंच असल्याचं सांगावं लागलं होतं.


नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीतील पराभवही भाजपसाठी चिंतेचा विषय झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळवता आला. त्यानंतर नांदेड, कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणच्या जागा काँग्रेस-महाविकास आघाडीने राखल्या. तर, शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय वळण लागले. भाजपने अखेरच्या क्षणी आपला अधिकृत उमेदवार मागे घेतला. मात्र, भाजप उमेदवाराच्या समर्थकांकडून नोटा बटण दाबण्यासाठीचे आवाहन करण्यात येत असल्याचा आरोप झाला. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या. त


सत्तांतरानंतर राज्यात दोन महत्वाच्या ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या. या ठिकाणी भाजपचेच उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पुन्हा विजय मिळवण्याचं आव्हन पक्षासमोर होतं. पण, तसं झालं नाही. भाजपचा पारंपरिक कबसा मतदारसंघ काँग्रेसच्या हातात गेला. यावेळीही स्थानिक भाजप नेत्यांकडून आत्मपरिक्षणाचीच भाषा करण्यात आली आहे.


काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह


जिथं भाजपला लागोपाठ दोन पराभव पहावे लागलेत, तिथं काँग्रेसला मात्र अच्छे दिन आलेत असंच म्हणावं लागेल. गेल्या दोन महिन्यांमध्ये काँग्रेसला लागोपाठ दोन मोठे विजय मिळालेत. फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधान परिषदांच्या निवड़णुकांमध्ये काँग्रेसनं भाजपसह संघाचा गड असलेल्या नागपुरासह अमरावतीत विजय खेचून आणला. नाशिक पदवीधरमध्ये योग्य नियोजन आणि संवाद व्यवस्थित झाला असता तर तिथंही त्यांचाच विजय झाला असता. पण, तिथं त्यांचाच बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे विजयी झालेत.  फेब्रुवारीत पाच पैकी दोन जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. त्यामुळे काँग्रेसचाही आत्मविश्वास वाढला होता. त्याचाच फायदा नुकत्य़ाच झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही दिसला असल्याची चर्चा सुरू आहे. 28 वर्षांनंतर काँग्रेसला कसब्यात विजय मिळाला. तिथं भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना मविआ-काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभूत केलं. विधान परिषद निवडणूक असो किंवा पोटनिवडणुका, काँग्रेसला यशाची चव चाखण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.