Ajit pawar On pune bypoll election :  पुणे पोटनिवडणुकीचा  निकाल पाहून माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी परिस्थिती झाली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. कसब्यात आमची जागा आली आणि चिंचवडमध्ये आमची मतं विभागली गेली. राहुल कलाटे उभे राहिले नसते तर चिंचवडमध्ये नाना काटे हे विजयी झाले असते, असंही ते म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, 1995 साली कसब्यात वसंत राव थोरातांनंतर भाजपचा उमेदवार निवडूण आला आणि त्यानंतर आतापर्यंत सातत्याने कसब्याची जागा गिरीश बापट यांनी आणि त्यांच्यानंतर मुक्ता टिळकांनी जिंकली. यावर्षी पोटनिवडणुकीसाठी आम्ही योग्य उमेदवार म्हणून रविंद्र धंगेकराची निवड केली. त्याचवेळी आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. मागील अनेक वर्षांपासून मी धंगेकरांना ओळखतो. तळागळात काम करणारा नेता आणि स्कुटरवर फिरुन लोकांची कामं करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे भाजपने कितीही जोर लावला असता तरीही धंगेकर जिंकला असता, असा विश्वास होता आणि आज धंगेकर जिंकले. हा विजय महाविकास आघाडीने खेचून आणला आहे, असंही ते म्हणाले.


तिकडे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटेंचा पराभव झाला. नाना काटे आणि राहुल कलाटे हे दोघेही आमच्याकडे उमेदवारी मागायला आले होते. त्यात आम्ही नाना काटे यांन उमेदवारी दिली. त्यामुळे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. राहुल कलाटेेंची बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले मात्र ते मानले नाहीत मागच्या निवडणुकीला आमच्या सर्वांमुळे राहुल कलाटेंना मोठ्या संख्येने मत मिळाले होते. त्यानंतर ते या निवडणुकीत होरपळून गेले. आता सकाळपासून त्यांना किती मतं मिळाले आपण पाहिलेच, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


बंडखोरी नसती तर जिंकलो असतो...



अश्विनी जगताप यांच्या मतांच्य बरोबरीत राहुल कलाटे आणि नाना काटेची मतं आहे. त्यात राहुल कलाटेंनी बंदखोरी केली आणि मतांची विभागणी झाली. नाही तर आम्ही निवडून आलो असतो. जरी भावनिक मुद्दा होता. दोन्ही मतदार संघात भाजपच्या जागा होत्या. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र सत्तधारी पक्षाने सर्व यंत्रणांचा वापर करुन विजय खेचून आणला, असंही ते म्हणाले.