Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बेरजेचं राजकारण सुरू आहे. गेल्या त्या दिवसांपासून एका बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी स्वतः शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढतानाच  भाजपमधील तसेच महायुतीमधील नाराजांना गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अगदी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापासून ते कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे, साताऱ्यातील मदन भोसले असे दिगज आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. 


समरजित घाटगेंचा राष्ट्रवादीत प्रवेश


कोल्हापूरचे समरजित घाटगे यांचा 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमधील प्रवेश निश्चित झाला आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील सुद्धा आगामी निवडणुकीसाठी तुतारी फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेरजेचं राजकारण जोरात सुरू केलं आहे. त्याचा फटका पर्यायाने भाजपला बसत आहे. त्यामुळे आता भाजपकडून सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात झाली आहे. याची पहिली झलक सांगलीमध्येच मिळाली आहे. सांगली हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजले जातो. त्यामुळे जयंत पाटील यांना घेरण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा


सांगलीमध्ये शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या भेटीने राजकीय भूवया उंचावले गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर विनोद तावडे यांनीच फोन करून माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली. या घडामोडींमुळे सांगलीच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विनोद तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आणि दोघांमध्ये बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असतानाच आता थेट प्रवेश होणार का? याकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता विनोद तावडे थेट भेटल्याने नाईक पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जात आहेत का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.


विनय कोरेंनी शब्द टाकताच महायुतीला ताकद


दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शिवाजीराव नाईक यांनी अप्रत्यक्षरीत्या का असेना यांना महायुतीला मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये शिराळा मतदारसंघांमध्ये शिवाजीराव नाईक यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार विनय कोरे यांनी शिवाजीराव नाईक यांची भेट घेत महायुतीचे धैर्यशील माने यांना ताकद लावण्यासाठी शब्द टाकला होता. त्यानुसार शिवाजीराव नाईक यांनी धैर्यशील माने यांना मदत केल्यानेच  शिराळा विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांना अपेक्षित मतदान झालं नसल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे एका बाजूने शरद पवार गटाकडून भाजपचे नेते गळाला लावले जात असतानाच आता भाजपकडूनही सूत्रे हलवण्यास सुरुवात झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या