Bharat Jodo Yatra Maharashtra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू झालेली 'भारत जोडो'(Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता भाजपकडून टीकेचा बाण सोडण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या या 'भारत जोडो' यात्रेत मागील अडीच वर्षातील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा वापरण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील ''भारत जोडो'' यात्रेत काँग्रेसच्या अधिकृत खात्यातून खर्च केला जात नसल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे या यात्रेवर होणाऱ्या खर्चाची चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. 


सोमवारी रात्री राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेने राज्यात प्रवेश केला. त्यानंतर आज सकाळी देगलूरमधून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात्रेवर टीका करताना म्हटले की, यात्रेत खर्च होणारा पैसा, काँग्रेसच्या पैसा कुठून आला, कोणी खर्च केला याची चौकशी उपमुख्यमंत्री आणि गृह विभाग सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी करावी. काँग्रेसच्या अधिकृत खात्यातून किती पैसे यात्रेसाठी वापरण्यात आले आहेत आणि प्रत्यक्षात किती यात्रेसाठी किती खर्च झाला, काँग्रेस नेत्यांनी जो खर्च केला आहे तो कुठून केला आहे हे या चौकशीत तपासले पाहिजे अशी मागणी बावनकुळे यांनी केली. 


नेत्यांच्या मुलांसाठी यात्रा


चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'भारत जोडो' यात्रेवर टीका करताना म्हटले की, 'भारत जोडो' यात्रेत लोक स्वत: हून येत नसून त्यांना आणले जात आहे. ही यात्रा नेत्यांनी हायजॅक केली आहे. ज्या जिल्ह्यातून यात्रा जाते, त्या जिल्ह्यातील नेत्यांच्या मुलांना पुढे आणले जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. 


भाजपमध्ये इनकमिंग


काँग्रेस कार्यकर्ते यात्रे दरम्यानच भाजपात प्रवेश करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण विचार करू शकणार नाही असे नेते भाजपमध्ये येतील असा दावा ही बावनकुळे यांनी केला. सध्या राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत, म्हणून काँग्रेसचे नेत्यांचे त्यांच्यासमोर बोलणं आणि शक्ती प्रदर्शन करणे काम आहे. मात्र पुढच्या काळात काँग्रेसला धक्के बसणार असणार असल्याचे सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी केले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: