Ramdas Kadam: राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अर्वाच्य भाषेचा वापर वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. शिवराळ भाषा वापरण्यात शिंदे गटातील नेत्यांची स्पर्धा सुरू आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली.
अनिल परब यांच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रामदास कदम यांनी आज रत्नागिरीतील खेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही असा सवाल रामदास कदम यांनी केला. अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणात शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली. त्यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली.
रामदास कदम यांनी म्हटले की, अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले. त्यांना लवकर अटक करायला हवी. दापोली-मंडणगडची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. ही नगरपालिका त्यांनी राष्ट्रवादीच्या घशात घातली. माझा मुलगा योगेश कदमला परब यांनी खूप त्रास दिला असल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनादेखील आपल्या भोवती असेच XXX लागतात अशा अर्वाच्य भाषेत कदम यांनी टीका केली. कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावरही टीका केली. देसाई हे उद्धव यांचे कान चावतात, त्यांचे कान भरत असल्याचे कदम यांनी म्हटले.
होय, शिंदे खोके देतात पण...
शिंदे गटावर विरोधकांकडून '50 खोके, एकदम ओके' अशा घोषणा दिल्या जात आहेत. त्यावर कदम यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोके देतात. पण ते जनतेच्या विकासकामांसाठी देत असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा 'बाप दाखव नाही तर, श्राद्ध घाल' असे आव्हानही त्यांनी दिले. गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे सर्व आमदार मी परत आणत होतो. पण राष्ट्रवादीची साथ सोडा एवढीच मागणी या आमदारांनी केली होती. पक्ष फुटला तरी चालेल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली होती, असा गौप्यस्फोटही कदम यांनी केला.