Lok Sabha Election 2024: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची लोकसभा (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये भाजपकडून (BJP) राज्यातील 20 नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर उर्वरित जागांबाबतचा 'सस्पेंस' अद्याप कायम असून याबाबत विविध कयास लावण्यात येत आहे. अशातच भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे विधान करत पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढणार असल्याचे सुतोवाच केले आहे.


यावेळी बोलतांना त्यांनी आपल्या खास शैलीत आपल्या उमेदवारी बाबत भाष्य केलंय. आपण कोरं पाकीट आहोत, जो पत्ता टाकला त्या पत्त्यावर पोहोचून जातो. असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी केलंय. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते. सध्या कोल्हापूरमधून लोकसभेसाठी चंद्रकांत पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा सुरूये. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला फार महत्व आलंय. पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार असल्याची तयारी असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.


मी कोरं पाकीट आहे, जो पत्ता टाकला त्या पत्त्यावर पोहोचून जातो


नुकतीच भाजपने दुसरी यादी जाहीर केली आणि देशातील काही चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. तर उर्वरित महाराष्ट्रतील काही जागांसाठी उमेदवार जाहीर न झाल्याने तेथील 'सस्पेंस' वाढला आहे. दुसऱ्या यादीत उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपची भूमिका काय? याबाबत विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत. अशातच सध्या कोल्हापूरमधून सध्याचे विद्यामन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता त्यांना पक्षाने आदेश दिला तर आपण नक्की ही निवडणूक लढणार असल्याची तयारी दाखवली आहे.


'त्या' जागेबाबत घोषणा करण्याचीही गरज


दरम्यान, राज्यात मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत अनेक चर्चा रंगत असताना या बाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता त्यांनी याबद्दल आपल्याला माहीत नसल्याचे म्हणत बोलणे टाळले आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्न पुरस्काराबद्दल योग्यवेळी निर्णय होईल. त्याची संजय राऊतांनी काळजी करू नये, असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावलाय. बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवारच लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा जंगी सामना रंगणार आहे. या बाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे, त्यासाठी घोषणा करण्याचीही गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या