मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election) राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना आता भाजप- मनसे- शिवसेना पक्षाची अखेर युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसेला काही जागा दिली जाण्याची चर्चा आहे. पण अद्याप काही विषय आहेत ज्यामुळे मनसे (MNS) हा प्रस्ताव स्वीकार करण्यास तयार नाही. काय आहेत हे विषय आणि मनसे लोकसभा निवडणूक महायुतीसोबत लढणार का? लोकसभा निवडणूक न लढता इतर फॉर्म्युला मान्य करत महायुतीत सामील होणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.


गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती. मनसेकरता एक ते दोन जागा सोडण्यास भाजप-शिवसेना तयार असल्याची माहिती होती. लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचाही पर्याय आहे. मनसेनं महायुतीच्या चिन्हावर लढण्याचा महायुतीकडून प्रस्ताव आहे. मात्र हा प्रस्ताव मनसेला मान्य नाही अशी चर्चा सुरू असल्यानंच राज ठाकरेंनी मुंबईतले सगळे दौरे रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. वाटाघाटी ‘ऑल वेल’ झाल्यास मनसे महायुतीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.


भाजप मनसेची वरिष्ठ पातळीवर चर्चा


लोकसभा निवडणुका तोंडावर असताना राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष या निवडणुकीत आपल्याला चांगलं यश मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चा असणाऱ्या भाजप-मनसे-शिवसेना युतीची चर्चा अखेर खरी ठरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे- भाजप- शिवसेना पक्षांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा पुढे जात आहे. 


अशी चर्चा आहे की मनसेला दक्षिण मुंबईची जागा दिली जाईल. पण भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आधीच या जागेवर काम सुरु केलं आहे. या मतदारसंघातून मंत्री मंगल प्रभात लोढा ही इच्छुक होते. पण ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा सामना करण्यासाठी मराठी उमेदवारच लागल असे रिपोर्ट आले. म्हणून नार्वेकरांनी काम सुरु केलं. 


बाळा नांदगावकरांचं नाव चर्चेत


या मतदारसंघात बाळा नांदगांवकर यांचा लोकांशी चांगला संपर्क आहे. मराठी व्होटर सोबतच जैन, मुस्लिम, बोरी मुस्लिम या समाजातही नांदगावकरांचा चांगला कनेक्ट आहे. यामुळे मनसेला सोबत घेतलं तर नांदगावकरांना उमेदवारी दिली पाहिजे अशा मताचे भाजपचे काही मोठे नेते आहेत. 


दक्षिण मुंबई मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील मतदार म्हणजे, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर दक्षिण मुंबईचा कौल ठाकरेंच्या बाजूनं झुकल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरेंना असलेली सहानुभूती जर मोडीत काढायची असेल तर त्यासाठी ठाकरेच लागतील हे भाजपनं वेळीच ओळखलं आणि मनसेला साद घातली आहे.


भाजप आणि शिवसेनेला मनसेला सोबत का घ्यावसं वाटतंय? 


राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत, हाच तिन्ही पक्षांमधील समान धागा आहे. महाराष्ट्रातील राजकारणात राज ठाकरे यांचे वलय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रातील राजकारणात करिष्मा करत आहे. त्यामुळे भाजप आणि सेनेला याचा फायदा होईल.


मनसेच्या स्थापनेनंतर गेल्या अनेक वर्षात मतदारांची टक्केवारी वाढतच चालली आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये या व्होटिंग बँकेचा अनेक पक्षांना चांगलाच फटका बसलाय. भाजप आणि शिवसेनेच्या केलेल्या सर्वेमध्ये मनसे आणि राज ठाकरे यांना चांगला फायदा होणार असल्याचं चित्र आहे.


राज्याच्या राजकारणात भूकंपाची शक्यता


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. अशात मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या हालचालींना देखील वेग येताना पाहायल मिळत आहे. त्यामुळे राजकीय पटलावर देखील अनेक घडामोडी पुढील काळात घडण्याच्या शक्यता आहे.


मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मागील काही महिन्यात सतत गाठीभेटी होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे मनसे आणि शिंदे गट आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या देखील भेटीगाठी होताना पाहायला मिळत आहे. त्यातच पुन्हा तिनही पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे युती लवकरच होणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


फायदा होत असेल तरच मनसे युतीसाठी तयार


गेल्या काही वर्षांपासून मनसेला भाजप ज्या कारणास्तव जवळ करत नव्हते, ज्याचा फटका निवडणुकात बसू शकणार होता, त्या परप्रांतीयांच्या मुद्द्याविषयी मनसे मवाळ झाली आहे. त्यामुळे आता युतीसाठी काही अडचण नसल्याने भाजप आणि शिवसेना मनसेला जवळ करत आहे. मात्र आपल्या पक्षाचा फायदा होत असेल तरच या युती संदर्भात सकारात्मक आहे अशी माहिती मिळते.  


लोकसभा निवडणुकीत विरोधक देखील जोरदार तयारी करतात. त्यामध्ये महायुती मनसेला सोबत घेऊन जाण्यासाठी आग्रही आहे. मात्र या युती संदर्भात फक्त चर्चा सुरू आहेत. अंतिम निर्णय हा लवकरच होईल. आगामी काळामध्ये मनसे भाजप शिवसेना युती होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर युती झालीच तर राज्याच्या राजकारणात मोठा घडामोडी देखील घडतील. 


ही बातमी वाचा: